पुणे : ‘आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण साधे हसणे देखील विसरून गेलो आहेत, असे असताना श्री. काटे यांच्या सारखे आपल्या आयुष्यात नवचैतन्य फुलवतात हा फार मोठा योगायोग गेली 20 वर्ष पुणेकर अनुभवत आहेत. हास्ययोगाद्वारे आलेले हास्य हे कृत्रिम नसून, ते हृदयातून येते अशा हास्याने आपल्या शरिराची आणि मनाची खुप चांगली जोपासना होते. पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, हे उल्लेखनीय आहे’, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
पुणेकरांच्या दिनक्रमात आरोग्यदायी हास्ययोग आणणार्या, विठ्ठल काटे व सुमन काटे यांनी सुरू केलेल्या हास्यक्लब चळवळीला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी गणेश कला क्रिडा मंच येथे झाला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हास्यवार्ता’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. शां.ब.मुजुमदार, उल्हास पवार, पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. संजय उपाध्ये, प्रकाश धोका, डॉ. रमेश गोडबोले, डॉ. मधूसुदन झंवर, डॉ. सुभाष देसाई, डॉ. सतीश देसाई, विकास रूणवाल, विनोद शहा, विजयराव भोसले (उपाध्यक्ष, नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), सचिव पोपटलाल शिंगवी (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), खजिनदार रामानुजदास मिणियार (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), समन्वयक मकरंद टिल्लू (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था) आदी उपस्थित होते.
‘केवळ ज्येष्ठच नाही तर तरुणपिढी देखील या हास्ययोगामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरत आहेत, याचा जास्त आनंद वाटतो.’ असे देखील महापौर टिळक म्हणाल्या.
हास्ययोग क्षेत्रातील योगदानाच्या द्वी दशकपुर्तीनिमित्त ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार’ संस्थेचे संस्थापक विठ्ठल काटे आणि सुमन काटे यांचा कार्यगौरव सोहळा देखिल पार पडला. मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल देऊन श्री. काटे यांचा सन्मान करण्यात आला.
आनंद मेळाव्यात डॉ.रामचंद्र देखणे यांचे ’काव्यशास्त्रविनोदेन’ या विषयावर व्याख्यान, डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘मन करा रे प्रसन्न’ कार्यक्रम, हास्ययोग प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. शां.ब.मुजूमदार म्हणाले, ‘विठ्ठल काटे हे खर्या अर्थाने ‘हास्ययोगाचार्य’ आहेत. मी गेली 55 वर्षे पुण्यात आहे, परंतु मी इतका हसविणारा कार्यक्रम पाहिला नाही. हसणे आणि हसविणे या दोन्ही गोष्टी अनुभवयाला मिळाल्या. पुण हे गंभीर चेहर्याचे शहर म्हटले जाते या गंभीर चेहर्याच्या शहराला विठ्ठल काटे यांनी हासरा चेहरा दिला आहे. हसणे हा योग आहे, एक औषधं आहे हे या हास्ययोग परिवाराने खरे केले आहे.’
पुणेकरांना हास्य देऊन त्यांचे जीवन हास्यमय करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या हास्ययोग परिवाराचा अनेकांना उपयोग होत आहे. त्यांच्या या निस्वार्थी कामाला योग्य व्यासपीठ देण्यासाठी पुणे महानगरपालिकेलची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले.
श्री. काटे याप्रसंगी बोलताना म्हणाले, ‘आपण या परिवाराद्वारे एक सशक्त भारत तयार करीत आहोत. राष्ट्रीय एकात्मता खुप मोठी आहे. भारत विविध जाती -धर्माचा देश आहे, या सर्वांना एकत्र बांधून एकत्र घेऊन सुसंवाद साधणे गरजेचे आहे. या करीता हास्ययोग परिवार अधिकाधिक वाढविणे आवश्यक आहे’
संस्थेविषयी माहिती देताना सचिव पोपटलाल शिंगवी म्हणाले, ‘1997 साली तणावमुक्त आयुष्य जगणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन विठ्ठल काटे यांनी हास्ययोग परिवार संस्थेची स्थापना केली. या वर्षी या कार्याची द्विदशकपुर्ती होत आहे. ही संस्था ‘लाफ्टरक्लब इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्थेशी संलग्न आहे. पुणे शहर, उपनगर, नाशिक, सातारा, वाई, महाड, मिरज, कोपरगाव, यवतमाळ, पंढरपूर, चंद्रपूर इ. ठिकाणी संस्थेच्या एकूण 157 शाखा आणि 15 हजारांहून अधिक सदस्य आहेत. योगाला हास्याची जोड देऊन लोकांचे आरोग्यमान सुधारणे हे या परिवाराचे मुख्य उद्दीष्ट आहे. संस्था अनेक सामाजिक कार्यात देखिल सक्रीय आहे. हे सर्व हास्यक्लब विनामुल्य असून, सर्वांसाठी खुले असतात. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला असून, संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.’
आनंद मेळाव्याच्या दुपारच्या सत्रामध्ये दु. 4.30 वाजता मनीषा लताड, ’गंधार एन्टरटेनमेंट्स’ आणि ’महक’ प्रस्तुत ’आज फिर जीने कि तमन्ना है’ या धमाल गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गफार मोमीन, विवेक पांडे, मनीषा लताड हे गायक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत संयोजन सईद बाबा खान यांचे आहे.