चिमणी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज : डॉ. सतीश पांडे
पुणे :तळजाई च्या जंगलाला काँक्रीटच्या डायनासोर च्या धडका बसत असताना सहकारनगरमध्ये पर्यावरणविषयक चर्चेसाठी ‘जीविधा कट्टा‘ स्थापन करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन डॉ. सतीश पांडे यांच्या ‘ चिमणी संवर्धन ‘ विषयावरील व्याख्यानाने झाला.
जीविधाच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त हा कट्टा स्थापन करण्यात आला. सहकारनगर परिसरात हा पर्यावरणविषयक मासिक कट्टा उपक्रम दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी होईल.
यावेळी बोलताना डॉ. सतीश पांडे म्हणाले, ‘ भारतात ४ प्रकारच्या चिमण्या अाढळत होत्या. पण, आता शहरात चिमण्या अतिशय कमी झाल्या आहेत.बिल्डींग संस्कृतीत घरटयांना जागा न उरल्याने, रोज डुंबायला स्वच्छ पाणी नसणे, कीटकनाशक वापराने अळ्या – कीटक हे अन्न कमी झाल्याने शहरात चिमण्या दिसत नाहीत. शहरातील वॉशिंग सेंटर वरील साबण, तेल युक्त पाणी पिल्याने तसेच सांडपाणी पिल्याने चिमण्या मरतात, असे आढळले आहे. मात्र, मोबाईल टॉवर रेडीएशनचा आणि चिमण्या कमी होण्याचा काही संबंध नाही.
चिमण्यांचे संवर्धन करायचे तर इमारतीच्या रचनांमध्ये घरट्यांना जागा ठेवावी लागेल. स्वच्छ अन्न, पाणी परिसरात ठेवावे लागेल.कृत्रीम घरटी ठेवण्यानेही मदत होते.
महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाने ईला फाऊंडेशन सोबत ‘ चिमणी संवर्धन प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागात आणि वनांमध्ये कामाची सुरवात केली आहे. त्यातून वनकर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.
मधुमालती सभागृह, पहिला मजला, जनता सहकारी बँकेच्या वर, दशभुजा गणपती मार्ग, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नंबर 2. येथे हा उद्घाटन कार्यक्रम झाला.
दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या बुधवारी जीविधा कट्टा पुणे महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात सुरू आहेच. या उपक्रमात तज्ज्ञांची वन्यजीव – पर्यावरण संरक्षण व संवर्धन माहितीपर व्याख्याने आयोजित केली जातात. आठ वर्षे जनजागृतीचा हा उपक्रम सुरू आहे.
पुणे शहरातील व्यग्र जीवन आणि ट्रॅफिक जॅम सारख्या समस्यांमुळे पर्यावरणाच्या चळवळीत सर्वसामान्यांना सहभागी होणे जमत नाही. त्यामुळे या विषयातील कार्यक्रम शहरातील विविध भागात आयोजित करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने सहकारनगर परिसरात जीविधा कट्टा सरू करत आहोत. हा उपक्रम सर्वांसाठी व विनामूल्य खुला आहे, असे जीविधाच्या संचालक वृंदा पंडीत यांनी सांगीतले. प्रीतम तुळशीबागवाले व सुधीर राव हे या मासिक कट्टयाची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.