पुणे, दि. २९ एप्रिल २०२२: एकामागे एक झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे गुरुवारी (दि. २८) धायरी, हिंगणे व डिएसके परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्री १०.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला. तर दुसऱ्या प्रकारात भूमिगत वीजवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर सनसिटी परिसरात चार रोहित्रांवरील वीजपुरवठा आज सकाळी पावणेसातच्या सुमारास सुरु करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की महापारेषण कंपनीकडून अतिउच्चदाब नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रामधील पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणच्या खडकवासला २२/११ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. यासंदर्भात संबंधित वीजग्राहकांना वीज बंद निवेदन तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात आली होती. यादरम्यान महावितरणकडून देखील उपकेंद्रातील करंट ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे व इतर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर खडकवासला उपकेंद्रातील यंत्रणेमध्ये एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चाचणी अभियंत्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु केले. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास खडकवासला उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र या दरम्यान धायरी रोड, किरकटवाडी, डिएसके विश्व परिसर, नऱ्हे आदी भागातील वीजपुरवठा बंद होता. उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडाबाबत व वीज पुरवठा कधी सुरु होणार याबाबतची माहिती देखील संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली होती.
तसेच सिंहगड रोडवरील सनसिटी परिसरात गुरुवारी (दि. २८) रात्री ८ च्या सुमारास भूमिगत वीजवाहिनी नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित झाला. बहुतांश परिसरात महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र संतोष हॉल ते सनसिटी परिसरातील ४ रोहित्रांचा पर्यायी वीजपुरवठा भारव्यवस्थापन शक्य नसल्याने सुरु करता आला नाही. दरम्यान महावितरणकडून भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे तात्काळ काम सुरु करण्यात आले. मात्र भूमिगत वीजवाहिनीला झाडाच्या मुळांनी गुरफटले असल्याने दुरुस्ती काम लांबणीवर पडले. त्यानंतर सकाळी ६.४५ च्या सुमारास या चारही रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
वाघोली परिसरात वीजपुरवठ्यात व्यत्यय– वाघोली परिसरात गुरुवारी (दि. २८) सकाळी ८ ते दुपारी चार वाजेपर्यंत पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यासंबंधी ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र रात्री ७.३० च्या सुमारास भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाला तो लगेच दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर रात्री ९.३० वाजता पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले व रात्री ११.४५ च्या सुमारास वाघोली परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.