अनधिकृत बांधकाम प्रतिबंध, नियंत्रण निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना , बांधकाम परवानगी कार्यशाळा
पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडए) आयोजित अनधिकृत बांधकाम प्रतिबंध, नियंत्रण निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना व बांधकाम परवानगीच्यावतीने आयोजित कार्यशाळेत रीतसर बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई व आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरे बांधण्यास अनुदान (बीएलसी) स्वरूपातील सर्वेक्षण व माहिती उपस्थित कार्यशाळेच्या माध्यमातून वेल्हा तालुक्यातील ग्रामस्थांना देण्यात आली.
हि कार्यशाळा आज वेल्हेतील कोंढावळे येथील लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, पंचायत समिती सभापती संगीता जेधे, उपसभापती दिनकर सरपाले, पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, गटविकास अधिकारी मनोज यादव, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी पंचायत समिती सभापती सीमा राऊत, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग जोडण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. पीएमआरडीए हे नियोजन करणारे प्राधिकरण आहे.
पंतप्रधान आवास योजना उत्कृष्ट आहे, त्यासाठी वेल्हे तालुक्यात होणाऱ्या घरकुलांसाठी एक कार्यशाळा राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे गायरान जागा विकासासाठी शासनाने उपलब्ध करून दयाव्यात. वेल्हे जोड़ रस्त्यांची कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविली जावीत असे आमदार थोपटे यांनी सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक म्हणाले की, ‘वेल्हा तालुक्यात रहिवासी नसलेले नागरिक विनापरवानगी सदनिका बांधण्याचे काम करीत आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा बसायला हवा. नागरिकांनी बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती तहसीलदार, ग्रामसेवक, व पोलीस पाटलांनी वेळोवेळी पीएमआरडीएला द्यावी. ‘
जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी कार्यशाळा सादरीकरणाच्या माध्यमातून पीएमआरडीए बांधकाम परवानगी कशा प्रकारे देते तसेच अनधिकृत बांधकाम नागरिकांनी केल्यास नेमके कोणत्या निकषांनुसार कारवाई केली जाणार आहे याविषयी माहिती दिली. वेल्हा हा झपाट्याने नागरीकरण व विकसित होणारा भाग असल्याने येथील गावठाण हद्द व झोन बदलाची माहिती नागरिकांना हवी. नागरिकांच्या सोयीसाठी नसरापूर येथे लवकरच पीएमआरडीएचे कार्यालय होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना हि आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व परवडणारी आहे. त्यासाठी अनुदान कशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वेल्हा ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.