झोपडपट्टी अस्तित्वात नसतानाही टिडीआर; नगरसेवक आबा बागूल यांचा आरोप
पुणे-झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टी अस्तित्वात नसताना डोळे झाकून टीडीआर दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक आबा बागुल यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यावर राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांनी चौकशीची मागणी करत त्यासाठी खास सभा बोलवण्याची विनंती केली. यावर महापौरांनी लवकरच विशेष सभा घेऊन त्यामध्ये एसआरएच्या अधिकाऱ्यांना बोलावून यासंदर्भातील सर्व आक्षेपांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
धानोरी येथील झोपडपट्टीचा 8180 चौरस मीटरचा टीडीआर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर अवलोकनार्थ आला होता. याठिकाणी झोपडपट्टीच नव्हती, त्यामुळे सभागृहात आलेल्या टीडीआरच्या प्रस्तावांवर कोणतीही शहानिशा न करता प्रशासन डोळे झाकून टीडीआर देत असल्याचा आक्षेप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी घेतला. त्यामुळे येथील टीडीआर देऊ नये, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहांमध्ये टीडीआर थांबवावा, अशी मागणी केली.
सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव केवळ अवलोकनार्थ आल्यामुळे थांबवता येणार नाही, असे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिले. त्यावर गटनेते वसंत मोरे म्हणाले, अशा प्रकारचे प्रस्ताव या अगोदर महापालिकेने थांबवले आहेत. त्यामुळे याची अंमलबजावणी करु नये, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका आयुक्त राव म्हणाले, सभागृहामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावांवर नगरसेवकांकडून अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत किती टीडीआर देण्यात आला, देण्यात आलेल्या टीडीआर खर्ची पडला की नाही , शहरातील झोपडपट्ट्यांच्या क्षेत्रफळाविषयी अनेक शंका आहेत. त्यामुळे याविषयी खास सभा लावून त्यात एसआरएच्या अधिकाऱ्यांना सुध्दा बोलावण्यात यावे. त्यावेळी चर्चेतून टीडीआर संदर्भातीलम सर्व शंका दुर होतील