पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसीएल) उभारलेल्या ‘व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले’बाबत (व्हीएमडी) झडलेल्या जोरदार चर्चेत या ‘व्हीएमडी’ची उभारणी बेकायदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या संबंधी स्मार्ट सिटी कंपनीला नोटिस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ‘फूटपाथ किंवा रस्त्याला अडथळा ठरणारे ‘व्हीएमडी’ काढून टाकण्यात येतील,’ असेही स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात सर्रास नव्या ‘व्हीएमडीं’ची उभारणी सुरू आहे. महापालिकेकडून ‘व्हीएमडी’ बसविण्यास परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे; तर दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीने हे ‘व्हीएमडी’ बसविण्यास दिलेल्या कंत्राटाची मुदत संपत असल्याने कंत्राटदाराने नवीन ‘व्हीएमडी’ बसविण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप . काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी वारंवार केला होता त्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तर देण्यास सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली. अखेर, महापालिका आयुक्त राव यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना या ‘व्हीएमडी’ची उभारणी करण्यात आली असली, तरी त्याला महापालिकेची परवानगी नसल्याचे सांगितले.
बागवे यांनी जाहिरात धोरणानुसार ‘एलईडी स्क्रीन किंवा व्हीएमडी कुठे उभे करता येतात,’ याची माहिती प्रशासनाकडे मागितली होती. त्यानंतर ‘फूटपाथवर अशा प्रकारचे स्क्रीन तथा ‘व्हीएमडी’ची उभारणी करता येऊ शकत नाही” असे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी स्पष्ट केले. बागवे यांनी हाच धागा पकडून ‘व्हीएमडी’वर कारवाईची मागणी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्मार्ट सिटी कंपनीद्वारे या ‘व्हीएमडी’ची उभारणी करण्यात आली असून त्यांना तत्काळ नोटिस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.स्मार्ट सिटी कंपनीची एक भाग असली तरी महापालिकेच्या परवानगीशिवाय त्यांना ‘व्हीएमडी’ची उभारणी करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीने तयार केलेल्या करारनाम्यात जाहिरात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असल्याचे बागवे यांनी सांगितले. आयुक्तांनी याबाबत खुलासा करताना महापालिकेच्या हिताचे पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल, असे सांगितले. महापालिकेचे नियम, निकषांशी सुसंगत असेल तरच या करारनाम्याला परवानगी देण्यात येईल. वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहनचालकांना त्रास होत असलेले व्हीएमडी काढून टाकण्यात येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
वर्षभरानंतरही निर्णय प्रलंबित
स्मार्ट सिटी कंपनीने ‘स्मार्ट मिशन’अंतर्गत शहरात १६१ ठिकाणी ‘व्हीएमडी’ बसविण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ११८ ठिकाणी व्हीएमडी बसविण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी व्हीएमडी बसविण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. त्यासाठीच्या जागाही महापालिका अधिकाऱ्यांच्या संमतीने अंतिम करण्यात आली होती. परंतु, हे व्हीएमडी बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीकडून हे ‘व्हीएमडी’ बसविण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळावी; म्हणून वारंवार विनंती करण्यात येत आहे. महापालिकेने वर्षभरानंतरही त्यावर निर्णय घेतलेला नाही.