– नायडू हॉस्पिटलमध्ये महापौरांकडून आढावा
– विलगीकरण केंद्रात जाऊन पाहाणी
पुणे (प्रतिनिधी)-
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा बेड असलेला विलगीकरण कक्ष नायडू रुग्णालय येथे त्वरित कार्यान्वित करण्यात आलेला असून संभाव्य उद्रेक आणि जास्त रुग्ण संख्या लक्षात घेऊन पाच मजली इमारतीमध्ये शंभर बेड तयार करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेतली जात असून महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष पाहणी करुन महापौर मोहोळ यांनी घेतला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागप्रमुख डॉ. राजेंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे यांच्यासह नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज असल्याचे सांगून महापौर मोहोळ म्हणाले, ‘मागील पंधरा दिवसांपासून दररोज दोन वेळा डॉक्टर्स, नर्सेस वॉर्डबॉय, आया, मेहतर मेहतरराणी यांना कोरोना संदर्भात प्रशिक्षण दिले आहे. त्याचशिवाय राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याबरोबर वेळोवेळी समन्वय बैठका घेण्यात येत आहेत. तर खाजगी रुग्णालयांसोबत संयुक्तिक बैठक घेण्यात आली आहे. १० खाजगी रुग्णालयांनी एकूण ३० विलगीकरण बेड्स व ११ आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.’
‘जनजागरण अंतर्गत पुणे मनपा रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत. रेडिओ एफएमवर आरोग्य विभागामार्फत जनजागरणपर मुलाखत आणि कोरोनविषयक माहिती प्रसार करण्यात आली आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घेणे आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना विशेष काळजी घ्यावी’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
कोरोनाचा एकही रुग्ण पुण्यात नाही
गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८२ रुग्णांकडे संशयित म्हणून पाहिले गेले. मात्र या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तर सध्या ४ रुग्ण नायडू हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत.
सहा महिन्यांत ‘नायडू’त अतिदक्षता विभाग !
संसर्गजन्य आजारांसाठी उभारलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत अतिदक्षता विभाग कार्यान्वित करणार असल्याची माहितीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.