‘देवदूत’ प्रकरणी सौरभ रावांची लागणार कसोटी …
पुणे- देवदूत नावाच्या निरुपयोगीआणि कुचकामी म्हणून पुढे आलेल्या यंत्रणेवर करोडोंची अनाठायी उधळन केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर येवूनही या भ्रष्टाचाराची माहिती उघड होवू नये म्हणून महापालिकेत काही बडी धेंडे कार्यरत असल्याने आता या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शोधून त्यावर कारवाई करणे कामी महापालिका आयुक्त सौरव राव यांची कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. या कसोटीत श्री राव हे किती सफल होतील ते देखील काही अवधीतच स्पष्ट होणार आहे .
देवदूत प्रकरणी मुख्य सभेत योगेश ससाणे आणि रवी धंगेकर यांनी मागणी करूनही काल सभागृहात प्रशासनाच्या वतीने म्हणणे सादर करण्यास महापौरांनी संधीच दिलेली नाही .तत्पूर्वी एक दिवस अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत देवदूत चे दर हे राज्य सरकारनेच ठरवून दिलेले आहेत असे राव यांनी स्पष्ट केले एवढेच नाही तर महापौरांनी आणखी गाड्या घेण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी असे पत्र दिले म्हणजे महापौर दोषी होत नाहीत असाच एक प्रकारे निर्वाळा दिला आहे .मात्र एका वृत्तपत्राने गेली काही दिवस देवदूत ची लक्तरे वेशीवर टांगून यात गैरव्यवहार झाल्यचा डंका पिटविलाआहे याकडे त्यांना दुर्लक्ष करून चालता येणार नाही . महापालिकेतला सिएसआर घोटाळा आणि त्यावरील चौकशी अहवाला गेली अडीच वर्षापासून मुख्य सभेत येतोच आहे. माय मराठी ने चव्हाट्यावर आणलेला आणि प्रत्यक्षात आरोपी पकडून दिलेल्या बोगस कामगार प्रकरणी देखील प्रशासनाने नावापुरती करायची म्हणून कारवाई केलेली आहे . महापालिकेच्या संगणक विभागाचा डेटा गायब प्रकरण देखील हवेतच गायब झाले आहे.अनेक चौकश्या आणि त्यांचे अहवाल बासनात गुंडाळून पडले आहेत जे कधीच समोर आलेले नाहीत . कोणतेही प्रकरण चौकशी करून अहवाल देवू असे सांगून थांबविण्याची महापालिकेची परंपरा अगाध मानली जाते .या सर्व पार्श्वभूमीवर आता सौरव राव यांच्या कडून आता देवदूत प्रकरणी ठोस कारवाईची अपेक्षा केली जाते आहे . जेवढी हि जबाबदारी राव यांच्यावर असणार आहे तेवढीच ती पक्षनेत्यांवर देखील आहे … अन्यथा अशा प्रकरनांवरून त्यांच्याकडे देखील संशयानी पाहायला संधी उपलब्ध होणार आहे हे स्पष्ट दिसते आहे .