पुणे- महापालिकेच्या वतीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या 85 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांचा विमा ‘दीनदयाळ उपाध्याय विमा योजने अंतर्गत उतरवण्यात येणार आहे. पालिकेच्या करदाता कुटुंबप्रमुख दुर्दैैवाने एखाद्या अपघातात सापडला तर त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेचा फायदा होणार आहे.आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत योजनेला मंजुरी देण्यात आली.
‘दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात ही योजना प्रस्तावित करण्यात अली असून त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या नुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातील दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 85 रुपये प्रति दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका यामध्ये प्रत्येक करदात्या कुटुंबाचा 85 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांचा उतरवणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला दिले जाईल. कराप्रमाणेच हा विमाही वार्षिक असेल. त्या वर्षात त्याला दुर्दैैवाने अपघात झाला तर त्याला विम्याचे पैसे तत्काळ मिळतील. याचीही रचना करण्यात आली आहे. थोडा जखमी असेल तर 25 हजार, गंभीर जखमी असेल तर 50 हजार, एखादा अवयव निकामी झाला असेल तर 1 लाख, त्यापेक्षा जास्त काही झाले असेल तर 2 ते 4 लाख व दुर्दैैवाने मुत्युमुखी पडल्यास 5 लाख रुपये दिले जातील.