पुणे- शहरातील एक महत्त्वाची हेरीटेज वास्तू असलेल्या डेक्कन कॉलेज व संशोधन संस्थेचे पुरातत्वशास्त्र, संस्कृत, मराठी इतिहास आणि प्रचीन भाषाशास्त्र या विषयांमध्ये मोठे योगदान आहे. या संस्थेने अनेक महापुरुष घडविले आहेत. या संस्थेचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन या संस्थेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. या कामासाठी महापौर निधीतून 50 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता मागणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिका हद्दीत ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 प्रमाणे हेरिटेड वास्तुंची यादी तयार करण्यात आली आहे. शहरात एकूण 245 हेरिटेज वास्तू आहेत. पालिकेच्या हद्दीत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन पालिकेतर्फे केले जाते. पुरातत्व विभाग, केंद्र शासन आणि राज्य शासन त्यांच्या अखत्यारित असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन व संवर्धन करते. मात्र अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, मिळकती निधी अभावी दुर्लक्षित राहतात. अशा महत्त्वपूर्ण वास्तुंपैकी डेक्कन कॉलेज संशोधन संस्था पालिकेच्या ग्रेड 1 यादीत समाविष्ट आहे.
ही संस्था 1834 साली बांधण्यात आलेली ही संस्था स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या संस्थेत लोकमान्य टिळक, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे संस्थापक आर.जी. भांडारकर, इतिहास तज्ज्ञ व्ही. के. राजवाडे, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, व्दारकानाथ कोटणीस यांच्यासारखे नामवंत विद्यार्थी घडले आहेत. या संस्थेत पुरातत्वशास्त्र, संस्कृत, मराठी इतिहास आणि प्रचीन भाषाशास्त्र या विषयांचे संशोधनाचे काम केले जाते. तसेच पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्र या विषयांमध्ये एम.ए., पी.एच.डीचे अध्यापन केले जाते. हे शिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेत देशासह विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतात.
अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संस्थेच्या हेरिटेज इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. इमारतीवरील पत्रे खराब झाल्याने इमारतीमध्ये पावसाचे पाणी साचते. छताची लाकडे सडली आहेत. दगडी रेव्हींग खचले आहेत. ब्रिटीशकालीन कलाकृतीच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. दगडी बांधकाम उखडले आहे, यासह विविध कामे करण्यासाठी महापौर निधीतून 50 लाख रुपये खर्च करण्याची सहमती स्थायी समितीने दिली आहे.