भाजपकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक आणि उपमहापौर पदासाठी नवनाथ कांबळे यांचा अर्ज दाखल
पुणे- महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांनी तर उपमहापौरपदासाठी नवनाथ कांबळे यांचा अर्ज आज (बुधवार) दाखल करण्यात आला.भाजपचे बहुमत पहाता हे दोघेही निवडून आल्याचे स्पष्ट असूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना निवडणूक विरोधक आहोत हे दाखविण्यासाठी लढणार आहेत .
दरम्यान यावेळी मला दिलेली जबाबदारी म्हणजे लोकमान्य टिळकांचा सन्मान आहे, अशा भावना मुक्ता टिळक यांनी व्यक्त केल्या.
महापौरपदासाठी अर्ज भरण्यासाठी महानगरपालिकेत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर पदाच्या उमेदवार मुक्ता टिळक, उपमहापौर पदाचे उमेदवार नवनाथ कांबळे, गटनेते श्रीनाथ भिमाले ,महेश वाबळे आणि भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या की, जशी आपल्याकडे सत्ता आहे तशीच जबाबदारी आहे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखत काम करणे गरजेचे आहे. मला दिलेली जबाबदारी म्हणजे माझ्या कुटुंबाने केलेल्या देशसेवेबद्दल मिळालेला हा सन्मान आहे. हा लोकमान्य टिळकांचा सन्मान आहे, असे मी समजते.
तर खासदार अनिल शिरोळे यांनी पुणे शहराचा कारभार पारदर्शकच होईल अशी ग्वाही दिली.
यावेळी खासदार संजय काकडे म्हणाले की, टिळक घराण्यातील व्यक्तीला आपण महापौरपद देतो म्हणजे ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. हा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांना दिला होता, बापट यांनी पाठपुरावा करून त्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.
तर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी म्हणाले की, जनतेला आपल्या पक्षाचा अजेंडा मान्य झाला आणि त्यानुसारच त्यांनी आपल्याला भरघोस मते दिली. आता हे लोक काम कसे करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे चांगली कामगिरी पार पडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हा आदर्श आपल्याला टिकवायचा आहे. हे नेतृत्व आता कायम राहील, असे मत व्यक्त केले.
तरीही लढणार राष्ट्रवादी आणि शिवसेना
भाजपचे पालिकेतील संख्याबळ पहाता सर्व पदे या पक्षाला बिनविरोध निवडून द्यायला हरकत नाही पण विरोधी पक्ष म्हणून केवळ दाखविण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना (हार मान्य करूनच )महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूक रिंगणात उतरत आहेत . अर्थात हि प्रथा आहेच . म्हणूनचमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून महापौरपदासाठी संगीता ठोसर आणि उपमहापौर पदासाठी विशाल धनवडे यांचा अर्ज नगरसचिव यांच्याकडे आज (बुधवारी) सादर करण्यात आला.
महापौरपदासाठी दि. 15 मार्चला निवडणूक होत असून भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचाच महापौर होणार आहे हे निश्चित असले तरी राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय काल स्पष्ट केला. त्यानुसार राष्ट्रवादीकडून आज अर्जही सादर करण्यात आले. त्यापाठोपाठ शिवसेनेनेही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेकडून महापौरपदासाठी संगीता ठोसर यांना तर उपमहापौरपदासाठी विशाल धनवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे अर्ज नगरसचिवांकडे आज सादर करण्यात आले.