आमदार माधुरी मिसाळ यांचे प्रतिपादन
जीतो पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
पुणे : पुरस्कार सर्वांनाच दिसतो. परंतु, पुरस्कार का मिळाला? याचा विचार आपण केला पाहिजे व पुरस्कार्थींचे कष्ट व त्यांचा संघर्ष समजून घेतला पाहिजे. यातून नवीन पिढीला प्रेरणा व काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. जीतो पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त चंदुभाई शहा यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अॅड. एस. के. जैन, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रमिला साकला, उद्योग क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल इंदर जैन व युवा उद्योजक म्हणून विशाल चोरडिया यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी चंद्रप्रभुजी म.सा., जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, मुख्य सचिव नरेंद्र छाजेड, खजिनदार कांतिलाल ओसवाल, सल्लागार मंडळाचे विजयकांत कोठारी, देविचंद जैन, अचल जैन, राजेश सांकला आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजोपयोगी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना दरवर्षी जीतोच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार हा त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून देण्यात येतो. तसेच, त्यातून इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे असा हेतु असतो. नवीन पिढीसमोर यामाध्यमातून आदर्श व्यक्तिमत्व समोर येतात. शिवाय पुरस्कार्थींनाही अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे विजय भंडारी यांनी सांगितले.
जैन धर्माचा विचार रुजविण्यासाठी कष्टाने काम करणारी जीतो संघटना आहे. जीतो नगरची सुरुवात पुण्यात होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. लवकरच संपूर्ण भारतात जीतो नगर प्रस्थापित होईल. जीवनात फक्त कुटुंबासाठी कष्ट आणि समर्पण केले तर कुटुंब तुम्हाला लक्षात ठेवते. परंतु, समाजासाठी समर्पण केले तर अनंत काळासाठी समाज तुम्हाला स्मरणात ठेवतो. हीच आयुष्याची शिदोरी असते, असा संदेश चंद्रप्रभुजी म.सा. यांनी यावेळी दिला.
जीतो नगर ही समाजाने समाजासाठी उभारत असलेल्या गृहप्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात आली. नवीन पिढीला आपली परंपरा व आपले संस्कार माहिती व्हावेत यादृष्टीकोनातून शास्त्राला अनुसरुन राहुल कपूर यांनी चरण स्पर्श कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितो पुणेचे मुख्य सचिव नरेंद्र छाजेड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जितो पुणेचे सचिव अजित सेठिया यांनी मानले.