पुणे, 15 नोव्हेंबर 2022
गुवाहाटी येथे 11-13 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या राष्ट्रीय पॅरा (दिव्यांग) जलतरण अजिंक्यपद, 2022 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करून खडकी येथील लष्करी रुग्णालयात मणक्याच्या दुखापतीच्या केंद्रात दाखल असलेले सैनिक खऱ्या अर्थाने धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक ठरले. शिपाई दीपक बर्मन, याला पोस्ट ट्रॉमेटिक पॅराप्लेजिया आहे आणि यापूर्वी त्याच्या पाठीच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याने 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेतही त्याने आपले सर्वोत्तम प्रयत्न दाखवले, पण त्याचे सुवर्णपदक हुकले आणि त्याने या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. त्याशिवाय त्याने 50 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक जिंकले. शिपाई अखिल टी, याने आपल्या गंभीर स्वरूपाच्या अपंगत्वावर मात करत सर्व अडचणींचा सामना केला आणि स्पर्धेच्या या प्रकारात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून पाचवे स्थान निश्चित केले.
अशा शानदार कामगिरीमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद दिसून येते. आपले कर्तव्य बजावताना मणक्याची दुखापत झाल्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना दुर्दैवाचा सामना करावा लागला. पण, खडकी येथील लष्करी रुग्णालयातल्या मणक्याची दुखापत विभागातील पथकाच्या मदतीने आणि कुटुंब आणि मित्रांच्या पाठींब्याने त्यांनी अलौकिक कामगिरी केली, जी करायला सक्षम शरीराच्या व्यक्तींना देखील संघर्ष करावा लागेल.
22 वी राष्ट्रीय दिव्यांग जलतरण अजिंक्यपद स्पर्धा, भारतीय पॅरालिम्पिक समितीने गुवाहाटी येथे 11 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित केली होती. या स्पर्धेत खडकी येथील मणक्याची दुखापत केंद्रातील दिव्यांग रुग्णांनी सर्व्हिसेस पॅरा स्विमिंग संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय सशस्त्र दल युद्धातही आणि शांततेच्या काळातही आपल्या सैनिकांची काळजी घेते. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीत उपचारा द्वारे सुधारणा केली जाते आणि पुण्यामध्ये खडकी येथील लष्करी रुग्णालयातील मणक्याची दुखापत केंद्रात त्यांचे पुनर्वसन केले जाते. ही प्रक्रिया जखमी व्यक्ती आणि त्याची काळजी घेणारं पथक दोघांसाठीही आव्हानात्मक आहे. पण, चिकाटी हळूहळू का होईना, यश देते. या अत्याधुनिक केंद्रामधील समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी आणि पुनर्वसन तज्ञ ट्रॉमा पॅराप्लेजिक रुग्णांच्या जीवनात आशा आणि नवीन अर्थ आणण्यासाठी चोवीस तास काम करतात. खडकी येथील लष्करी रुग्णालयातील हे केंद्र अशा रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेले पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्मिलन प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीईजी (BEG) खडकी येथील लष्कराच्या अपंग पुनर्वसन केंद्राने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील यशाचा मार्ग मोकळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.