पुणे, दि. १५: कामगार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये जिल्हा कृती दलामार्फत विविध ठिकाणी धाडसत्राचे आयोजन करणे, बालकामगार प्रथा विरोधी फलक प्रदर्शित करणे, फेरीचे आयोजन करणे तसेच विविध व्यवसायिक, मालक व संघटना आदी कडून बालकामगार कामावर ठेवणार नाही अशा स्वरुपाची हमीपत्रे भरुन घेण्यात येत आहे. बालमजूरी विरोधी शपथ घेणेआदी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्यातील नवीन तरतुदीनुसार १४ वर्षाखालील मुलांना मजूरी करण्यास भाग पाडणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत सजगता बाळगावी तसेच १४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना धोकादायक काम करण्यास भाग पाडणे, अशा गुन्ह्यांपासून सर्वानी दूर रहावे. मुलांना शाळेत पाठविणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. सर्वानी मिळून बालमजुरी या अनिष्ट प्रथेचे समुळ उच्चटन करुया, असे आवाहन अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ यांनी केले आहे.