केंद्रीय संचार ब्यूरो च्या वतीने गांधी जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
अमरावती, 30 सप्टेंबर 2022
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावतीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त गांधीजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
“मोहनदास ते महात्मा” या गांधीजींच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचे आयोजन येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात दि 02 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते होणार असून आमदार प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त डॉ. दिलिप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर आदी मान्यवार उपस्थित राहणार आहेत .
दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून लोकांना महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवाससोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख देखील होणार आहे. या प्रदर्शनाद्वारे विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती आणि लाभ दिले जाणार आहेत. निवडणुक विभागाच्या वतीने नवीन मतदारांची नोंदणी, मतदान कार्ड सोबत आधार कार्ड जोडणी प्रक्रिया, आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत तर डाक विभागाच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना, सुरक्षा बीमा योजना ह्या सारख्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ घेता येऊ शकेल. खादी विभागाच्या वतीने खादी प्रदर्शन आणि विक्री केंद्र तसेच मनपा अमरावतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रदर्शनी स्टॉल लावण्यात येणार आहे.
दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत आयोजित हे प्रदर्शन निःशुल्क असून जनतेने मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले आहे.