पुणे, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्यावतीने आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथे ‘आपत्ती मित्र’ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे माजी संचालक कर्नल व्हि. एन. सुपणेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण सत्रात भूकंप, त्सुनामी, महापूर, शोध व बचाव, रस्ते अपघात, प्रथमोपचार, रेस्क्यु बोट, सर्पदंश, आग, व प्रात्यक्षिके आदी विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या तुकडीत जिल्ह्यातील ५०० आपत्ती मित्रांना प्रशिक्षित केले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व ५ लाख रुपयांचा विमा, रेस्क्यू बॅग, आपत्ती मित्रचे ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली आहे.