नाशिक: (दि.22) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार -2022’ आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील विजेते 46 स्पर्धेकांना मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 52 महाविद्यालयातील 282 विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे 152, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 102, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) व शिक्षक(टिचर)चे 28 स्पर्धक सहभागी होते अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षाणाअंती विविध गटातील एकूण 46 स्पर्धेकांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, स्पर्धेच्या माध्यमातून संशोधकांना नवीन संशोधन कल्पनेला चालना मिळते. स्पर्धकांना विविध विषयातील संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष पहाता येतात त्याचा त्यांना संशोधन कार्यात उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती व उत्साह कौतुकास्पद आहे. समाजोपयोगी व जागतिकस्तरावर नावलौकिक होईल असे संशोधन कार्य विद्यार्थ्यांनी करावे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आविष्कार- 2022 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यानी करमणूकीत फारसे न गुंतता संशोधनावर लक्ष द्यायलाच हवे. विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन काम करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव कल्पना घेऊन संशोधन कार्यात सहभाग वाहून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाडून विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच याकरीता आर्थिक मदत करण्यात येते याची माहिती सर्वानी घ्यावी. विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती वाढीस लागावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. सामाजिक आरोग्यासाठी आपले संशोधन महत्वपूर्ण ठरेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.
अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुुमार मोरे यांनी मानले. अविष्कार – 2022 आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेकरीता विद्यापीठातील श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्रीमती प्रतिभा बोडके, श्री. आबाजी शिंदे आदींनी कर्मचाÚयांनी परिश्रम घेतले.
अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुवर्णा गणवीर, डॉ. प्रिती बजाज, डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. राजेश वानखेडे, डॉ. गणेश घुगे, डॉ. परशुराम पवार, डॉ. त्रिवेणी काळे, डॉ. तापस कुंडू, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. शर्मिला सूर्यवंशी, डॉ. अपूर्व शिंपी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. स्पर्धेत विजेते विद्यार्थी व शिक्षकांचे विद्यापीठ परिवार व मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.