मुंबई, दि. १२ ऑगस्ट – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात फोन करून दुरुपयोग करणं हे अत्यंत निंदनीय आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार राज्याच्या हितासाठी योग्य नसून असे काही घडल्यास राज्य सरकारला भविष्यात अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागेल अशी भीती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
राज्याचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो, त्या मंत्रालयात शरद पवारांच्या नावाने सिल्व्हर ओक बंगल्यातून फोन खणाणला, “मी सिल्व्हर ओकमधून शरद पवार बोलतोय.” असा आवाज काढत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात हा फोन करण्यात आला असून त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, पवार साहेब अशाप्रकारचे कधीचं फोन करणार नाहीत, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. परंतु आज त्यांच्या आवाजात फोन करून दुरुपयोग करणं हे अत्यंत निंदनीय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.