प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था
पुणे : पुणे मेट्रोच्या लाईन ३ ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ११ नोव्हेंबरपासून या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या दोन्ही स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स बसवले आहेत. तसेच प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि त्यांना ये-जा करताना अडचण येऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.
सध्या पुणे मेट्रो लाईन ३ वर २० गाड्या धावत असून, दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो धावत आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून मेट्रोच्या गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचे पीआयटीसीएमआरएल’तर्फे सांगण्यात आले आहे.
याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, “प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवाशांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.”
ते पुढे म्हणाले, “बालेवाडी परिसरातील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. उर्वरित स्थानकांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.”
पुणे मेट्रो लाईन ३ हा माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर यांना जोडणारा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावरील १७ स्थानके सध्या प्रवाशांसाठी सुरू आहेत. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कचा पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक भागांशी संपर्क अधिक सुलभ झाला असून, रस्ते वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाला आहे.

