दिनांक 10 ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजनः विविध कार्यक्रमांतून उलगडणार शरद पवार यांचे व्यक्तिमत्व
पुणेः- ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालगंर्धव रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात शनिवार दिनांक 10 डिसेंबर ते सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 असा तीन दिवसीय शरदोत्सव आयोजीत करण्यात आला असून या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्व परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन, शिल्पकला प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि माजी महापाैर दीपक मानकर यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली .संवाद पुणे चे सुनील महाजन यांची ही मूळ संकल्पना आहे .
शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात शरद पवार यांच्या विविध 82 भावमुद्रांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी चित्रकार विशाल केदारी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 5.00 (पाच) वाजता ‘लोकजीवनाशी एकरुप शरद पवार’ या विषयावर ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी 6.00 (सहा) वाजता ‘मैत्र जीवांचे’ या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, संभाजी पाटील ( कर्नल ) आणि बारामतीचे जवाहर वाघोळीकर आदी मान्यवर शरद पवार यांच्याबरोबरच्या अतूट मैत्रीचे अनोखे किस्से सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलान सचिन ईटकर करणार आहेत. रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 (बारा) वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात ‘शेती-मातीशी जोडलेले व्यक्तिमत्त्वः शरद पवार’ या विषयावर पत्रकार सुधीर भोंगळे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 5.30 (साडेपाच) वाजता ‘शरद पवार यांचे राजकारण काल, आज, उद्या’ या विषयावर परिसंवाद होणार असून वात्रटिकाकार रामदास फुटाणे, भाजपा प्रवक्ते माधव भांडारी, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात शरद पवार यांचे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत साकारणार आहेत. सायंकाळी 5.00 (पाच) वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘शरदाचे चांदणे’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम पार्श्वगायिका मनीषा निश्र्चल सादर करणार आहेत. या संगीतमय कार्यक्रमानंतर प्रसिद्ध सितार वादक उस्मान खाँ, प्रसिद्ध सतारमेकर मजिदभाई, प्रसिद्ध धृपद गायक पंडित उदय भवाळकर आणि प्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सत्कार सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगपती अभय फिरोदिया यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
रसिकांनी या तीन दिवसीय शरदोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि माजी महापाैर दीपक मानकर यांनी केले आहे.