पुणे – आजवर शिवसेनेच्या बळावर निवडून आलेले पालकमंत्री गिरीश बापट यांना सत्तेची सूज आणि मस्ती चढली आहे. तसेच त्यांनी सेनेच्या उपकाराची जाणीव ठेवलेली नाही. आगामी पालिका निवडणुकीत शिवसैनिक त्यांची सूज उतरविल्याशिवाय राहणार नाहीत,आणि त्यांची जागा त्यांना दाखवु असा इशारा शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी युवा सेनेच्या मेळाव्यात दिला. विशेष म्हणजे या मेळाव्यात शहरप्रमुखांसह इतर वक्त्यांनी देखील बापट यांनाच टार्गेट केले.
कसबा विधानसभेत मतदार संघात युवा सेनेचा भव्य मेळावा काल दि. ४ मार्च रोजी सायंकाळी पार पडला. या मेळाव्यास युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर, पुणे शहर शिवसेना प्रमुख विनायक निम्हण, उपशहरप्रमुख विशाल धनवडे, गटप्रमुख समन्वयक गजानन पंडित, विभागप्रमुख दीपक कुंजीर, विजय मारटकर व हजारो युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कसबा मतदार संघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असून अगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवून पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत असे निम्हण यांनी यावेळी बोलताना सांगितले. पुणे शहारातून निवडून गेलेल्या आठ आमदारांपैकी एक जणही पुण्यातील प्रश्नावर सभागृहात तोंड उगडत नाही.मोदींनी जनतेला फसवले आहे, अच्छे दिन फक्त बापट यांना आले आहेत असेही ते म्हणाले. आगामी काळात जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनता मोदींवर नाराज आहे, त्यामुळे आगामी पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेचा महापौर केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही, असे निम्हण यांनी यावेळी सांगितले.
अमोल किर्तीकर म्हणाले, कसबा मतदार संघ कुणाचा बालेकिल्ला आहे, हे बापट यांना पालिका निवडणूकीनंतर समजेलच पण आपण युवा सेनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या युवकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मागील काही महिन्यापासून शिवसेनेतर्फे विविध आंदोलने केली जात आहेत. शिवसेनेची बांधीलकी ही जनतेशी आहे, सत्तेशी नाही. त्यामुळे आपली कामे शिवसैनिकांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले पाहिजे असे अमोल किर्तीकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा शेलाभेट देऊन निम्हण आणि किर्तीकर यांनी त्यांचे स्वागत केले.