पुणे : जामीन मिळविण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करणा-या गुंड नीलेश श्रीनिवास बसवंतला गुन्हे शाखेने अटक केली आहे.युनिट एकचे पोलिस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली होती की, बसवंत हा खेड शिवापूर येथील दग्याजवळ घरच्यांना भेटण्यासाठी येणार आहे. या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली
बसवंत हा बापू नायर टोळीचा सदस्य आहे. बसवंत यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्याने कर्करोगासाठी आवश्यक केमोथेरपी व सिटी स्कॅन करण्यासाठीचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करीत जामीन मिळवला होता. मात्र हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर न्यायालयाचीच फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसवंत हा सराईत गुन्हेगार आहे. जून ते जुलै 2020 या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी व अन्य गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान, त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.
सदर ची कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी,पोलीस आमंलदार अमोल पवार, योगेश जगताप, इम्रान शेख,अजय थोरात, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर आदींच्या पथकाने केली