पुणे-महाराष्ट्र शासनाने नुकतीच संपूर्ण राज्याकरिता (मुंबई शहर वगळता)बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली (Unified DCPR) मंजूर केली आहे. शासनाच्या या क्रांतिकारी व पुरोगामी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या निमित्ताने क्रेडाई महाराष्ट्र व एमसीएचआय यांनी संयुक्तपणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास विभागाचे अधिकारी यांचा सत्कार सोहळा ऑनलाईन वेबिनारद्वारे नुकताच पार पडला.
याप्रसंगी बोलताना या बांधकाम नियमावलीद्वारे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास व घराच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. या नियमावलीमुळे राज्याच्या विकासावर व बांधकाम व्यवसायावर दूरगामी व चांगले परिणाम होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील भरीव मदत होणार आहे. बांधकाम व्यवसाय हा शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय असून गेली तीन-चार वर्षांपासून या व्यवसायाला आलेली मरगळ दूर होऊन मोठ्या प्रमाणात व्यवसायात चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. क्रेडाई सामाजिक बांधिलकी जपून कोविड कालावधीमध्ये हॉस्पिटल उभारणीसाठी संपूर्ण राज्यभर केलेल्या मदतीचा व निसर्ग वादळात कोकण किनारपट्टीमध्ये केलेल्या कार्याचा खास उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला.
शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयासाठी एकनाथ शिंदे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या मंत्री मोहोदयांचा तसेच या नियमावली मंजुरी प्रकियेमध्ये अविरत परिश्रम घेतलेले नगरविकास प्रधान सचिव भूषण गगरानी,नगर रचना संचालक सुधाकर नागपुरे , नगर रचना सहसंचालक प्रकाश भुक्ते व अविनाश पाटील यांचा देखील सत्कार क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर,उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, पुणे शहर अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहोळा पार पडला.
सत्कार प्रसंगी बोलताना नगर विकास प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सदर नियमावलीमध्ये सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असल्याचे सांगून त्यास जगन्नथाच्या रथाची उपमा देऊन सर्वच घटकांनी विशेषतः क्रेडाईने याकामी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले.
क्रेडाई महाराष्ट्र तर्फे या पारदर्शक नियमावलीचे स्वागत करताना सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दारात घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याध्यक्ष राजीव परीख यांनी दिले तर राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी हि नियमावली अत्यंत प्रोत्सानात्मक असून पुढील २० वर्ष या नियमावलीद्वारे सर्व बांधकाम व्यावसायिक चांगले कार्य करतील अशी ग्वाही दिली ,अशी सर्वसमावेशक नियमावली देशभर लागू व्हावी असे मत देखील व्यक्त केले.
या वेबिनारमध्ये या बांधकाम नियमावलीमध्ये असलेल्या प्रमुख बाबींचे सादरीकरण भुक्तेसाहेब यांनी केले. तसेच क्रेडाई सदस्यांच्या नियमावलीबाबतच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देखील दिली. राज्यभरातून जवळपास ६०० बांधकाम व्यवसायिक व वास्तुविशारद यांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदविला.