पुणे, दि.1 मार्च 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने तर, मुलींच्या गटात श्रावणी देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत बिगरमानांकीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने चौथ्या मानांकित नवी मुंबईच्या सेरेना रॉड्रिक्सचा 7-5, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 55मिनिटे चालला. सामन्यात दहाव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 5-5 अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर श्रावणीने बॅकहॅण्डचे सुरेख फटके मारत अकराव्या गेमला सेरेनाची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये श्रावणीने आपला दबदबा कायम ठेवत चौथ्या व सहाव्या गेममध्ये सेरेनाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. श्रावणी ही नववी इयत्तेत सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत असून महाराष्ट्र मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद असून चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील गटातील पहिलेच विजेतेपद आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात औरंगाबादच्या अव्वल मानांकित नीरज रिंगणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत पुण्याच्या अर्चित धूतचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. नीरज हा आठवी इयत्तेत नाथ व्हॅली स्कुलमध्ये शिकत प्रशिक्षक रुपेश रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व आठ एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व सहा एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक म्हाळुंगेचे उपसरपंच विवेक खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रविण झिटे, प्रणव वाघमारे आणि स्पर्धा निरीक्षक तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी:नीरज रिंगणगावकर(1) वि.वि.नील केळकर 9-5;अर्चित धूत वि.वि.अर्जुन किर्तने 9-6;अंतिम फेरी: नीरज रिंगणगावकर(1) वि.वि.अर्चित धूत 6-2, 6-2;
मुली: उपांत्य फेरी: सेरेना रॉड्रिक्स(4)वि.वि.प्रिशा शिंदे(1)9-3; श्रावणी देशमुख वि.वि.श्रेया पठारे 9-3;अंतिम फेरी: श्रावणी देशमुख वि.वि.सेरेना रॉड्रिक्स(4) 7-5, 6-3.