पुणे : पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विरोधी पक्षनेतेपद बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे नियोजन करण्यात येत असून, त्यानंतर नव्या विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.पूर्व भागाला आणि दक्षिण भागाला राष्ट्रवादीने आज पर्यंत बऱ्यापैकी बळ दिले आहे आता बाणेर बालेवाडी या भागाला बळ द्यावे आणि त्यासाठी बाबुराव चांदेरे यांना विरोधीपक्ष नेते पद द्यावे असा पक्षातील प्रवाह असताना , दक्षिण पुण्यातील विशाल तांबे यांचे नाव पहिल्यापासून आघाडीवर आहे .त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठींबा असल्याचे बोलले जाते .या पार्श्वभूमीवर तांबे आणि चांदेरे या नावात या पदासाठी चुरस दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
तुपे यांची नुकतीच शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तुपे यांच्याकडील पद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. तुपे स्वत:ही हडपसर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदाऱ्या नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान तुपे यांची पालिकेच्या राजकारणावर मोठी भिस्त आजवर राहिल्याने या पार्श्वभूमीवर हे पद गेले तर त्यांची तशी राजकीय कुचंबना होऊ नये याकडे देखील पक्ष लक्ष देऊ शकेल अशी स्थित आहे .मात्र या साठी ते हडपसर मधून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे कारण देऊन त्यांचा पक्षनेतेपदाचा प्रवास थांबवावा यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत .या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
माजी महापौर दत्ता धनकवडे, विशाल तांबे, दिलीप बराटे, बाबूराव चांदेरे अशा ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी विचार करण्यात येत आहे.