पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभागच्या वतीने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा संपन्न -‘युनिव्हर्सल स्पोर्टस् अकादमी’ दत्तवाडी शाखेचा प्रथम क्रमांक
पुणे :
महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभाग’च्या वतीने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम पारितोषिक ‘युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकादमी’च्या दत्तवाडी शाखेने पटकाविले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांनी दिली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी उपमहापौर दीपक मानकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस नितीन जाधव, कसबा अध्यक्ष सुरेश बांदल आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष विपुल म्हैसूरकर व उपाध्यक्ष ओम कासार यांनी केले होते.
या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये विविध शाखांमधील 125 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते महेंद्र गोकुळ, नगरसेवक रवींद्र अण्णा माळवदकर व प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते झाले होते.