मुंबई, 16 सप्टेंबर 2022
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या वतीने आज ‘महाराष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संमेलन’ आयोजित करण्यात आले. मुंबईमध्ये झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘जागतिक मूल्य साखळीसाठी स्पर्धात्मकता निर्माण करणे’, या विषयावर आधारित हे संमेलन होते. यावेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया सारख्या संस्थांच्या योगदानामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र प्रगती करत आहे. इतर देशांप्रमाणे उच्च तंत्रज्ञान वापरून आपले क्षेत्र काम करेल. निर्यात वाढवून आयात कमी व्हायला हवी; यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा देऊन उद्योजक वाढवू इच्छितो, असा मानस नारायण राणे यांनी यावेळी बोलून दाखविला.
निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादन वाढून भारत ‘आत्मनिर्भर’ व्हावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील वाटते. यासाठी येत्या 5 वर्षात लघुउद्योजक वाढायला हवेत, याकरिता आम्ही नियोजन करत आहोत. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांची यामध्ये मदत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले. उद्योजकांच्या अडचणी दूर करणे, हेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे काम आहे. तरुणवर्ग औद्योगिक क्षेत्राकडे वळावा, त्यांनी रोजगार निर्माण करावेत; यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही पूर्ण ताकद लावू, असे आवाहन नारायण राणे यांनी यानिमित्ताने केले.
एमएसएमईच्या विकासासाठी एमएसएमई मंत्रालय ताकदिनिशी काम करत आहे. सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे ध्येय-धोरणे निश्चित होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या काही काळात केलेल्या योजनांमुळे आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे सीएमडी शिवसुब्रमण्यम यांनी व्यक्त केली.
एमएसएमई क्षेत्र आर्थिक वृद्धीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बाजवते. जीडीपीमध्ये 40% पर्यंतचा त्यांचा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये 48 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. या क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देणे, जागतिक पातळीवर मूल्यवर्धन करणे यासाठी भारत सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत, असे ASSOCHAM नॅशनल कौन्सिल ऑन ग्लोबल व्हॅल्यू चेनचे अध्यक्ष व महाराष्ट्र एमएसएमईचे संचालक विनोद पांडे यांनी सांगितले.