पुणे, दि. 14 : वीजमीटरमध्ये फेरफार करून सुरु असलेली घरगुती वीजग्राहकाकडील 23 लाख 8 हजार रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे.
याबाबत माहिती अशी, की कोथरूड विभाग अंतर्गत एरंडवणा येथील छाया सोसायटीमधील रहिवासी लीला रिखबलाल भंडारी यांच्या नावे थ्रीफेजची घरगुती वीजजोडणी आहे. तथापि, या वीजजोडणीतील वीजवापराबाबत महावितरणने अद्यावत तंत्रज्ञानातून केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यानुसार भंडारी यांच्या घरातील वीजजोडणीची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनी वीजचोरीची शक्यता स्पष्ट झाल्याने पंचनामा करून वीजमीटर जप्त करण्यात आला. चाचणी विभागात तपासणी केल्यानंतर या वीजमीटरमध्ये फेरफार करून त्याची गती संथ होईल अशी सोय केल्याचे स्पष्ट झाले. यात एकूण 1,09,236 युनिटची म्हणजे 23 लाख 8 हजार 10 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. मुकुंद चौधरी, उपकार्यकारी अभियंता श्री. सारंग हातोळकर, सहाय्यक अभियंता श्री. उदय साठे, तंत्रज्ञ दीपक खेडकर, विशाल बुर्डे आदींनी योगदान दिले.