बारामती – राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज बारामती नगरपरिषद मतदाना दिवशी शहरातील तीन मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तेथील मतदान व्यवस्थे विषयी माहिती घेवून मतदारांशी संवाद साधला.
बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 साठीच्या बुधवार दि. 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान प्रकीये दिवशी सकाळी 9 वाजता मुख्य निवडणुक आयुक्त श्री सहारिया यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर बारामतीच्या निवडणुक निरिक्षक ज्योत्स्ना हिरमुखे, निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडून निवडणुकी विषयी माहिती घेतली. तर अतिरिक्त पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांच्याकडून कायदा सुव्यव्यवस्थे विषयी माहिती घेतली.
त्यानंतर श्री. सहारिया यांनी मोरगाव रोडवरील ढवाणवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 1, 2 व 3 या ठिकाणी भेट देवून रांगेत उभ्या असणा-या मतदारांशी संवाद साधला. तसेच निवडणुक आयोगाने यावेळेपासून नव्याने निर्देश दिल्या प्रमाणे सर्व उमेदवारांच्या शपथपत्राचा गोषवारा मतदान केंद्रावर लावण्यात आला आहे का याची पाहणी केली. शपथपत्राच्या गोषवा-या विषयी मतदारांशी संवाद साधला. तसेच मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असणा-या महिला पोलीस कर्मच्या-यांचीही विचारपूस केली. मतदान केंद्रावर असणा-या मतदान अधिकारी व कर्मचा-यांशीही संवाद साधला. निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती शहरात प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी निवडणुक निरिक्षक ज्योत्स्ना हिरमुखे, निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसिलदार हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी प्रमोद काळे उपस्थित होते.