पुणे: महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांसाठी असलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात नवीन वीजजोडणी देण्यास शुक्रवारी (दि. 22) प्रारंभ झाला असून एकाच दिवशी परिमंडलात शहरी व ग्रामीण भागातील 555 ठिकाणी नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली व बिलींग प्रणालीत अॅपद्वारेच त्याची नोंद घेण्यात आली आहे.
महावितरणने वीजग्राहकांसाठी एक तर महावितरण अंतर्गत मीटर रिडींग, नवीन वीजजोडणी व कर्मचारी मित्र असे एकूण चार मोबाईल अॅप्स नुकतेच सुरु केलेले आहेत. यातील नवीन वीजजोडणी मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोटेशन भरलेल्या वीजग्राहकांकडे नवीन मीटर लावणे व त्याची बिलिंग प्रणालीत नोंद घेण्यास सुरवात करण्यात आली.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्ग दिवाकर, सुंदर लटपटे, सुनील पावडे यांच्यासह सर्वच 12 विभागांतील अभियंता व कर्मचारी यांनी मोबाईल अॅपमधून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविला तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री. एकनाथ चव्हाण यांनी तांत्रिक सहकार्य केले. महावितरणकडे नवीन वीजजोडणीसाठी कोटेशनची रक्कम भरलेल्या वीजग्राहकांकडे नवीन वीजमीटर बसविल्यानंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहक क्रमांकासोबत मीटर क्रमांक, मीटर रिडींग व मीटर रिडींगचा फोटो अॅपद्वारे बिलिंग प्रणालीत अपलोड करण्यात येत आहे. त्यानुसार आता पुढील महिन्यांपासून वीजग्राहकांना देयके प्राप्त होणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे नर्हे येथील पारस कन्स्ट्रॅक्शनच्या योगेश्वरी पार्कमधील 58 फ्लॅटसाठी आज नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. या ठिकाणी नवे वीजमीटर लावण्यात आले व त्याची अॅपमधून बिलिंग प्रणालीत नोंद घेण्यात आली. पारस कन्स्ट्रक्शनचे श्री. संतोष कुंकुलोळ यांनी महावितरणच्या या मोबाईल अॅपचे स्वागत केले. ते म्हणाले, काळाप्रमाणे महावितरणने ग्राहकसेवेत केलेला बदल व अॅपमधून दिली जाणारी जलद सेवा आनंद देणारी आहे. नवीन वीजजोडण्यांसाठी करावी लागणारी प्रतीक्षा मोबाईल अॅपद्वारे संपुष्टात आली आहे.
पुणे परिमंडलात मोबाईल अॅपमधून कार्यान्वित करण्यात आलेल्या 555 वीजजोडण्यांमध्ये बहुतांश घरगुती तर व्यावसायिक वीजग्राहकांचा समावेश आहे. आज सर्वाधिक पर्वती विभागात 116 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या तर पिंपरी – 113, कोथरूड – 97, भोसरी – 43, शिवाजीनगर – 49, नगररोड – 33, रास्तापेठ – 5, पद्मावती – 3, बंडगार्डन – 31, मंचर – 21, मुळशी – 26 व राजगुरुनगर विभागात 18 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.
नवीन वीजजोडणी देण्याची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ऑनलाईन होत असून मोबाईल अॅपद्वारे तांत्रिक पडताळणी, नवीन मीटर कार्यान्वित करणे, त्याची बिलिंग प्रणालीत नोंद करणे, नवीन वीजजोडणीच्या स्थळाची अक्षांश रेखांश अशी भौगोलिक नोंद करणे आदी कामे होणार आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी कमीत कमी वेळेत महावितरणकडून देण्यात येईल अशी माहिती मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिली.