मुंबई : महावितरणच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत होणाऱ्या कामांना अधिक गती देण्यासाठी कंत्राटदारांची आढावा बैठक महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रत्यक्ष कंत्राटदारांकडून कामाच्या प्रगतीविषयी माहिती व अडचणी समजावून घेतल्या व महत्वपूर्ण निर्देश दिले.
या बैठकीत कंत्राटदारांच्या कामाच्या प्रगतीचे विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले. कंत्राटदाराच्या कामाची प्रगती आणि त्याबाबतची इतर तांत्रिक माहिती संचालक (प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक सर्वश्री. चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे यांनी बैठकीत दिली. यावेळी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. तसेच कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी यावेळी दिला.
बैठकीला मुख्यालयातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, संबंधित मंडल कार्यालयातील पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यालयातील संबंधित अभियंते व अधिकारी तसेच राज्यातील दिनदयाळ ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये काम करणारे कंत्राटदार उपस्थित होते.