बारामती : महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात दि.31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर प्रादेशिक स्तरावर आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात विजेतेपद पटकावलेल्या नाटकांची आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय स्पर्धा बारामतीत होणार आहे. दि.31 जानेवारी रोजी (बुधवारी) सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत लातूर परिमंडलातर्फे ‘रातम्तरा’ हे नाटक सादर करण्यात येईल. याच दिवशी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 या वेळेत भांडूप परिमंडलातर्फे ‘नजरकैद’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दि.1 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत पुणे परिमंडलाच्या वतीने ‘मेकअप’ या नाटकाचे सादरीकरण होईल. तर दुपारी 3 ते 5.30 या वेळेत नागपूर परिमंडलाच्या वतीने ‘ते दोन दिवस’ हे नाटक सादर करण्यात येईल.
गुरुवारी (दि.1) सायंकाळी 6 वाजता महावितरणचे संचालक (संचालन) श्री.अभिजित देशपांडे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक (पुणे) श्री.संजय ताकसांडे, सहव्यवस्थापकीय संचालक (औरंगाबाद) श्री.ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक (प्रकल्प, मा.सं.) श्री.चंद्रशेखर येरमे, प्रादेशिक संचालक (कल्याण) श्री.सतीश करपे, प्रादेशिक संचालक (नागपूर) श्री.भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेत सादर होणाऱ्या सर्व नाटकांसाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. तरी बारामती व आसपासच्या परिसरातील सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने या नाट्यप्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्पर्धेचे निमंत्रक तथा बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.नागनाथ इरवाडकर यांनी केले आहे.