पुणे : महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडलच्या अधीक्षक अभियंता म्हणून श्री. राजेंद्र पवार मंगळवारी (दि. 2) रूजू झाले. ते याआधी नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.
अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार हे 1989 मध्ये तत्कालिन राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता म्हणून नाशिक, नवी मुंबई येथे काम केले. सन 2011 मध्ये त्यांची थेट भरतीमधून कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. या पदावर त्यांनी कल्याण व मुळशी (पुणे) येथे काम पाहिले आहे. त्यानंतर थेट निवड भरतीत अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी नागपूर ग्रामीण मंडलमध्ये काम केले. आता पुणे ग्रामीण मंडलमध्ये ते रुजू झाले आहेत. सर्वच वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासह अचूक रिडींगचे वीजबिल व वीजयंत्रणा सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले.