पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील असाक्षर व्यक्तींसाठी रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ७ लाख परीक्षार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
परीक्षेच्या पूर्वतयारीचा व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (योजना) व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
परीक्षेचे स्वरूप व नियम
ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा नऊ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. वयाची १५ वर्षे पूर्ण केलेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींना परीक्षेला बसता येईल. परीक्षेसाठी एकूण १५० गुण असून, वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विभागांसाठी प्रत्येकी ५० गुण असतील. प्रत्यक्ष परीक्षा तीन तासांची असून, दिव्यांग परीक्षार्थ्यांना ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येईल.
ज्या शाळांमधून असाक्षर व्यक्तींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे, त्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत राहतील. परीक्षार्थ्यांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा बँक पासबुक यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी शाळास्तरावर करण्यात येणार असून, मूल्यांकनाचे गुण उल्लास पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यात येतील.
नवसाक्षरांना पुढील शिक्षणाची संधी
FLNAT परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (NIOS) किंवा राज्य मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (SIOS) माध्यमातून इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता येणार आहे.
राज्यातील असाक्षर व्यक्तींनी शिक्षणासाठी नजीकच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच, जास्तीत जास्त नवसाक्षरांनी FLNAT परीक्षेला उपस्थित राहून साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
[6:21 pm, 16/10/2026] +91 96894 94987: समाज कल्याण विभागामार्फत पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम
चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण
पुणे, दि. १६ (जिमाका, वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेवर आधारित सेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, योग व ध्यान सत्र, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती जनजागृती, मतदार नोंदणी, शासकीय योजनांची माहिती तसेच अनाथालय व वृद्धाश्रमांना भेटी आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वसतिगृह व निवासी शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेत गट अ मध्ये यशराज निखील दहींजे, गट ब मध्ये प्रणाली दादा कांबळे आणि गट क मध्ये शितल गोकुळ तायडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेत गट अ मध्ये संतोष शिवराया डोंगरे, गट ब मध्ये ऐश्वर्या विनायक कांबळे आणि गट क मध्ये अंजली सुग्रीव बडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी माधुरी वाघमोडे यांनी केली. सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच गुणवत्ता पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती कायम राखावी, असे सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल, निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, बार्टीचे प्रकल्प अधिकारी, समतादूत आणि विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

