विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतली दखल़, कार्यवाहीचे दिले आश्वासन
पुणे-
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना, त्यांच्यात काही त्रुटी राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय सुसूत्रीकरण चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्यासमवेत आज पुणे शहरातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेताना अनेक उपाययोजना सुचविल्या. प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधींना नेमकी माहिती मिळावी, यासाठी पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, गरज भासल्यास त्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना केली.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पुढील गोष्टींवर चर्चा झाली
1) विलगीकरण कक्षांत मूलभूत सुविधांची कमतरता व योग्य यंत्रणेचा अभाव यामुळे उद्भवणारया गंभीर समस्यां विभागीय आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिल्या. तेथील खोल्या व स्वच्छतागृहांची अस्वच्छता असून, टेस्टिंग यंत्रणा, टेस्टिंग अहवाल येण्यामध्येही दिरंगाई होत आहे. या मध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे सांगितले.
2) न्याहारी, जेवण, चहाच्या निमित्ताने बाधित आणि संशयित काही वेळ एकत्र येण्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे घाबरून रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. तसेच संशयित रुग्ण येथे येण्यास टाळाटाळ करू शकतील. त्यातून नव्या समस्या उदभवू शकतात, असे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
3) विलगीकरण केंद्रात संशयितांना देण्यात आलेल्या बिछान्यावर बेडशीट नसल्याचे दिसून आले आहे. तसेच बिछान्याच्या निर्जंतुकीरणाची व्यवस्था नसल्याने रुग्ण धास्तावतात. त्यामुळे येथे संशयित आणताना त्याला स्वतःचे बेडशीट व त्याच्या बीपी, डायबेटीसच्या दैनंदिन औषधाच्या गोळ्या आणि स्वतःच्या गरजेच्या वस्तू आणाव्यात, अशी सूचना करावी.
4) कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेबरोबर काम करू इच्छिणाऱया डॉक्टर तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्यक ते किटही देण्यात यावेत.
5) शिक्षक, समूह संघटिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून संशयित शोधण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज, शक्य असल्यास PPE कीट पुरविण्यात यावे. जागेवरच तपासणी करण्यासाठी Thermoscanner, Oxymeter उपलब्ध करून द्यावेत.
6) खासगी पॅथ लॅबमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिका यंत्रणेस पाठविण्यास बंधनकारक करण्यात यावे.
रक्तदान शिबिरात घ्यायची दक्षता, गर्भवतींच्या आरोग्याची काळजी, रुग्णवाहिकांची कमतरता आदी मुद्द्यांवरही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सर्व मुद्द्यांची नोंद घेतली असून या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी आमदार चेतन तुपे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे देखील या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.