मालेगावात लागलेल्या उर्दू बॅनर्सवरुन टोला
मुंबई-
अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटते का? हे त्यांनाच विचारा. असा हल्लाबोल उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगावात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या उर्दू बॅनर्सवरुन देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. शहरातील कॉलेज मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही सभा होईल. कोकणातील खेड येथील सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र मालेगावमध्ये उर्दूत लागले्या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, शहराच्या मुस्लिमबहूल पूर्व भागात उर्दू भाषेतदेखील स्वागताचे बॅनर झळकले असून त्यावर ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा उल्लेख असल्याने बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
देवेंद्र फडणवीसांना या बॅनर्सबाबत विचारले असता ते म्हणाले, उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटले तर आम्हाला काही हरकत नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल.
उद्धव ठाकरे यांच्या या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी ठाकरे गटाच्या वतीने उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. मालेगावच्या चौकाचौकात सध्या हे बॅनर्स दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत शुक्रवारीच मालेगावात दाखल झाले आहेत. शनिवारी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले.