अतिक्रमण कारवाईबाबत महापालिकेचे स्पष्ट निर्देश; फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई कायम
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्कासन मोहिमेदरम्यान दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केलेल्या मागणीला यश मिळाल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याऐवजी दुकानांचे नामफलक काढण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
गणेश बिडकर यांचा आयुक्तांकडे पाठपुरावा
अतिक्रमण कारवाईदरम्यान दुकानांचे अधिकृत नामफलक काढले जात असल्याची बाब सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, यासाठी दुकानांचे नामफलक काढण्याची कारवाई थांबविण्याची मागणी त्यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) जावक क्रमांक १९४० अन्वये कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.
दुकानांच्या भिंतीवरील पाट्या काढण्यास मनाई
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण निष्कासन मोहिमेदरम्यान दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी संबंधित दुकानांच्या फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात यावीत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पदपथावरील तसेच पदपथालगतच्या अनधिकृत साईनबोर्ड आणि अन्य अतिक्रमणांवर मात्र नियमानुसार कारवाई सुरू राहणार आहे.
आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश
सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह निरीक्षक आणि कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासही संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील दुकानदारांना दिलासा मिळणार असून, व्यापाऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भूमिका बिडकर यांच्या वतीने मांडण्यात आली आहे.

