कोंढव्यातील वेलकम चौक आणि वानवडीतील संविधान चौकात धडक कारवाई; एका रात्रीत १३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई
पुणे, दि. २२ नोव्हेंबर (माय मराठी प्रतिनिधी) : पुणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या पाच दिवसांत शहरातील एकूण ५० अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आले असून, कोंढव्यातील वेलकम चौक आणि वानवडीतील संविधान चौक परिसरात महापालिकेने विशेष मोहीम राबवली.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शनिवारी (२१ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून रविवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजेपर्यंत अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १३ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कोंढव्यातील वेलकम चौक तसेच वानवडीतील संविधान चौक परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यात आले.
विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत महापालिकेने एकूण ५० अनधिकृत होर्डिंग्ज हटवले आहेत. रविवारी दुपारपर्यंत कोंढव्यातील वेलकम चौक परिसरात कारवाई सुरू असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

