एफडीएच्या १० कारवायांत ५ कोटींचा साठा जप्त; दोन गुन्हे दाखल, ३२ जण आरोपी; आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कठोर आदेश
मुंबई : कालबाह्य झालेले, खराब झालेले तसेच ग्राहकांकडून परत आलेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून त्याच पदार्थांचे पुन्हा पॅकेजिंग करून बाजारात विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) स्वतंत्र अनुपालन आदेश (कॉम्प्लायन्स ऑर्डर) जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
एफडीएने गेल्या काही दिवसांत केलेल्या १० कारवायांमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, कंपनी मालकांसह ३२ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
कागदोपत्री विल्हेवाट; प्रत्यक्षात पुन्हा विक्री!
कालबाह्य, खराब झालेले किंवा परत आलेले अन्नपदार्थ नियमानुसार नष्ट करणे आवश्यक असताना काही ठिकाणी केवळ कागदोपत्री विल्हेवाट लावल्याचे दाखवले जात असल्याचे मुंढे यांनी सांगितले. प्रत्यक्षात एजंटच्या माध्यमातून हा माल पुन्हा बाजारात आणला जातो. त्याचे नव्याने पॅकेजिंग केले जाते. काही प्रकरणांमध्ये उत्पादनाच्या तारखांमध्येही फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाजारात येता कामा नये!
नव्या आदेशानुसार कालबाह्य, खराब झालेले आणि परत आलेले अन्नपदार्थ चांगल्या मालापासून स्वतंत्र ठेवणे बंधनकारक असेल. अशा पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याचा पुरावा संबंधित कंपन्यांना सादर करावा लागेल.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या विल्हेवाट व्यवस्थापन संस्थांकडून अन्नपदार्थ नष्ट केल्याचे प्रमाणपत्र घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
कंपनी लहान असो किंवा मोठी, कालबाह्य अन्नपदार्थांची एकही पिशवी पुन्हा बाजारात येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.
भिवंडी, अंबरनाथ आणि पडघ्यात धडक कारवाई
भिवंडीतील गुलजार नगर परिसरात सुरुवातीला ८० हजार रुपयांचा, तर त्यानंतर २६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. वडपे परिसरातील दोन ठिकाणांसह अंबरनाथ आणि पडघा येथेही एफडीएने कारवाया केल्या.
या मोहिमेत संबंधित व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या १० कारवायांमध्ये एकूण सुमारे ५ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
विविध अन्न व्यवसायांसाठी २२ स्वतंत्र आदेश
कारवाई हा केवळ नियमांची अंमलबजावणी करण्याचा एक मार्ग असून, अन्न व्यवसायातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत हॉटेल व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय पोषण आहार आदी विविध क्षेत्रांसाठी २२ अनुपालन आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांद्वारे अन्न व्यवसायिकांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, याबाबत स्पष्टता करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्नपदार्थांच्या विल्हेवाट प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवण्याचा एफडीएचा प्रयत्न आहे.

