भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे ठाकरे बंधू आणि काँग्रेसला आव्हान
ठाकरे बंधूंनी दुटप्पीपणा सोडावा, पर्यावरणावर बोलणे ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासाठी फॅशन आहे : आमदार अमीत साटम
मुंबई – जेव्हा मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा मध्य वैतरणा धरणासाठी कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ५४० हेक्टरवर दोन लाख झाडे लावण्यासाठी मुंबई महापालिकेने करोड रुपये खर्च केले. बीडमधील त्या वृक्षलागवडीच्या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंनी पर्यावरण पर्यटनासाठी जरूर जावे आणि जनतेला ती २ लाख झाडे दाखवावीत, असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिले.
कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पप्रकरणी वृक्षतोडीवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना शुक्रवारी आमदार साटम यांनी भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
शाश्वत विकास भाजपसाठी कमिटमेंट असून विरोधकांसाठी केवळ फॅशन आहे. पर्यावरणाच्या नावाखाली ठाकरे बंधू आणि काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असून अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत. ठाकरे बंधूंना व काही अभिनेत्यांना शाश्वत विकासाची शिकवणी लावण्याची गरज आहे. कर्जतचा पंप स्टोरेज प्रकल्प स्वच्छ ऊर्जेचे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकल्प ३००० मेगावॅटचा असून ३७७ हेक्टरवर उभारला जात आहे. इतक्या मेगावॅटच्या औष्णिक प्रकल्पासाठी मुंबईच्या १५ पट जागा लागणार असून २८ कोटी वृक्ष लावावे लागतील, असा दावा आमदार साटम यांनी केला.
भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता झाला आहे. अनेक बड्या राष्ट्रांना भारताचे यश खुपते आहे. त्यामुळे कोणताही नवा प्रकल्प देशात उभा राहत असेल तर परदेशी मदतीच्या जोरावर शहरी नक्षलवादी त्याला विरोध करतात. आता त्यामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा गट आणि काही अभिनेते सामील झाले आहेत, असा आरोप आमदार साटम यांनी केला. यावेळी आमदार साटम यांनी बीड जिल्ह्यात बृहन्मुंबई महापालिकेने २ लाख झाडे लावण्यासाठी निवडलेल्या १३ गावांतील साईटची छायाचित्रे दाखवली. ठाकरे बंधूंनी तेथे आवश्य पर्यटन सहल करावी, अशी टिप्पणी आमदार साटम यांनी केली.
गेल्या दहा वर्षांत देशातील आणि महाराष्ट्रातील वृक्षाच्छादनात वाढ झाली आहे. जगाची पंप स्टोरेज पॉवर क्षमता २०१ गीगावॅट झाली आहे. चीन, जपानने यामध्ये मोठी गती घेतली आहे. भारताची क्षमता केवळ ७.४३ गीगावॅट असल्याचे आमदार साटम यांनी सांगितले राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना आमदार साटम म्हणाले की , कर्जतच्या प्रकल्पामधून राज ठाकरे हे गुजरातला वीज पुरवणार असे खोटे कथानक पसरवत आहेत. रमेश किणी हत्या प्रकरणातील आरोपी सुमन शाह आणि लक्ष्मीकांत शाह हे देखील गुजरातचेच होते, याकडे आमदार साटम यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्राच्या प्रगतीला विरोध करून उद्धव आणि राज ठाकरे व काँग्रेस हे पाकचा अजेंडा राबवत आहेत, राज्याच्या विकासाच्या मुळावर आलेली ही मंडळी आहेत, असा आरोप आमदार साटम यांनी केला.

