-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा
- मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार महोत्सवाचे यंदाचे पर्व
- ४१ मराठी सिनेमांसह परिसंवाद, मुलाखती, कार्यशाळा आणि अन्य उपक्रमांची पर्वणी
- महोत्सवातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार!
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २०२६ : मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’च्या यंदाच्या पर्वाची घोषणा सोमवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. हा महोत्सव १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
मराठी चित्रपटांना केवळ चित्रपटगृहांपुरते किंवा पुरस्कारांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना अधिक व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देणे आणि नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांना प्रोत्साहन देत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने गेल्या वर्षीपासून चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे दुसरे पर्व संपन्न होत असून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक व ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग व महामंडळाचे संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी संबोधित करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, मराठी सिनेमा सशक्त आहे. मराठी सिनेमांविषयी जगभरच्या प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. आशयसमृद्ध असलेल्या मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हक्काचे व्यासपीठ असावे, या विचारातून गेल्या वर्षीपासून चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव आम्ही सुरू केला. गेल्या वर्षीच्या पहिल्याच पर्वास सिनेप्रेमींनी भरघोस प्रतिसाद देऊन महोत्सव यशस्वी केला. मराठी चित्रपटांचे सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व अधोरेखित करतानाच चित्रपटसृष्टीतील विविध घटक, माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक आणि चित्रपट रसिक यांच्यात सकारात्मक संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांमध्ये सातत्य आवश्यक असते. त्यामुळे यंदा या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करित आहोत, असे सांगत- मराठी चित्रपटांची समृद्ध परंपरा, आशयवैविध्य आणि कलात्मक सामर्थ्य अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘चित्रपताका’ हे प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती देताना मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, यंदाच्या महोत्सवात एकूण ४१ मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये पाच जुन्या अभिजात मराठी चित्रपटांचा समावेश असेल. उर्वरित ३६ चित्रपटांमध्ये नवीन, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेले, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले, प्रयोगशील तसेच अप्रदर्शित चित्रपटांचा समावेश असेल. सामाजिक, ऐतिहासिक, ग्रामीण-शहरी जीवन, स्त्रीकेंद्री अनुभव, समकालीन प्रश्न आणि विविध मानवी नातेसंबंधांचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण प्रवाह महोत्सवाद्वारे प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच यंदा राज्यातील दुष्काळस्थितीच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवातून संकलित होणार महसूल दुष्काळ निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपुर्द करण्यात येणार असल्याचेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे-पाटील यांनी प्रास्ताविक करून महोत्सवाची संकल्पना, पहिल्या पर्वाला मिळालेला प्रतिसाद आणि यंदाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. ‘चित्रपताका’च्या पहिल्या पर्वाचे आयोजन एप्रिल २०२५ मध्ये करण्यात आले होते. पहिल्या पर्वात महोत्सव सुरू होण्यापूर्वीच दोन हजारांहून अधिक प्रेक्षकांनी नोंदणी केली होती, तर संपूर्ण पर्वात जवळपास ७,५०० प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. पहिल्या पर्वाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचा उत्साह लक्षात घेऊन दुसरे पर्व अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन श्रीमती स्वाती म्हसे-पाटील यांनी याप्रसंगी केले. त्या म्हणाल्या की, मराठी सिनेमाला उज्ज्वल परंपरा आहे. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. कान्स, इफ्फी यांसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांत मराठी सिनेमाला महामंडळ संधी उपलब्ध करून देत असते. मात्र, आपला स्वत:चा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जावा, जेणेकरून त्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल, असा विचार पुढे आला. त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव ही संकल्पना आकारास आली. सांस्कृतिक कार्य विभागाने या कल्पनेस पाठबळ दिल्याने महामंडळ या महोत्सवाचे यशस्वी आयोजन करित आहे. महोत्सवातील विविध उपक्रम, नोंदणी प्रक्रिया आणि प्रेक्षकांसाठीच्या सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले असून, राज्यातील तसेच राज्याबाहेरील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करून श्रीमती स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की, मराठी चित्रपटसृष्टीतील विविध पिढ्यांमधील दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, तंत्रज्ञ आणि निर्माते यांच्या सर्जनशीलतेची दखल घेण्याबरोबरच, लोकप्रिय चित्रपटांसोबत आशयप्रधान आणि प्रयोगशील चित्रपटही प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा या महोत्सवाचा प्रयत्न आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेडेकर हे यंदाच्या महोत्सवाचे संचालक, तर सिनेअभ्यासक-दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे हे क्युरेटर आहेत. विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासांतील अधिकाऱ्यांनाही महोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
…………………
विविध कार्यक्रमांची पर्वणी
चित्रपट प्रदर्शनाबरोबरच यंदाच्या पर्वात पाच परिसंवाद, पाच विशेष मुलाखती आणि पाच मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर परिसंवादांमध्ये चर्चा होईल. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिलेल्या चित्रकर्मींच्या मुलाखतींतून त्यांचे अनुभव, विचार आणि कार्यप्रवास उलगडला जाईल. चित्रपटनिर्मितीतील तंत्र, कला आणि विविध पैलूंवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा अर्थात मास्टरक्लासेस होतील. याशिवाय, मराठी चित्रपटांच्या शतकोत्तर वाटचालीचा प्रवास आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आलेख मांडणारे विशेष प्रदर्शनही महोत्सवस्थळी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि चित्रनगरीचे योगदान यांचा वेध घेण्यात येणार आहे.
माध्यमांतराल चालना देणारा ‘पुस्तक ते सिनेमा’ उपक्रम
यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे ‘पुस्तक ते सिनेमा’ (बुक टू स्क्रीन) हा उपक्रम. मराठीतील उत्तम कथाविषय असलेल्या आणि चित्रपटाच्या माध्यमात रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांचे लेखक व प्रकाशक यांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्मिती संस्थांशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्यकृतींचे चित्रपटांमध्ये रूपांतर होण्यासाठी व्यावसायिक सहकार्याचे नवे मार्ग खुले व्हावेत, हा या उपक्रमामागील हेतू आहे, अशी माहिती महामंडळाच्या वतीने यावेळी देण्यात आली. तसेच ‘तरुणांच्या नजरेतून महाराष्ट्र’ या विषयावर लघुपट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता आणि कथनशैली यांच्या आधारे तीन लघुपटांची निवड केली जाईल. निवडलेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात येणार आहे. यामुळे नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
यंदाच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. कोणताही विशेष डामडौल न करता चित्रपटकलेला प्राधान्य देऊन महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी नोंदणी शुल्क प्रतिव्यक्ती १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या नोंदणी शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारणाच्या कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येईल. याशिवाय, दुष्काळग्रस्तांसाठी अतिरिक्त योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डोनर पास’ अर्थात ‘सामाजिक कृतज्ञता प्रवेशिका’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

