सर्वांना सुखी ठेवा, कुणालाही आत्महत्या करावीशी वाटू नये अशी शक्ती द्या; तुळजाभवानी चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडे
शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीच्या तक्रारींवर पाठपुरावा करणार; मायक्रो फायनान्सच्या कर्जहप्त्यांची फेररचना करण्याची मागणी
तुळजापूर, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा लाभ गावपातळीवर पोहोचणे आवश्यक आहे. पाणी, चारा आणि रोजगाराच्या उपलब्धतेबाबत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मनोबल टिकवण्यासाठी सर्वांनी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अजित पिंगळे, सुनीता मोरे आणि सुनीता काळे उपस्थित होते.
विधान परिषदेत पाचव्यांदा आमदार म्हणून संधी मिळाल्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी गोंधळ अर्पण करून देवीप्रती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“सगळ्यांना सुखी ठेवा आणि कुणालाही आत्महत्या करावीशी वाटणार नाही, अशी शक्ती द्या,” असे साकडे देवीच्या चरणी घातल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मनोबल टिकवणे आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळी परिस्थितीत विविध सवलती लागू केल्या आहेत. शिक्षण शुल्कातील सवलती, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था, जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेतील कामांना गती देणे आवश्यक आहे. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याची तरतूदही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या सरसकट क्षेत्रनिहाय आर्थिक मदतीच्या मागणीबाबत बोलताना, मदतीची रक्कम ठरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ स्तरावर प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार मदत करेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील, असे त्या म्हणाल्या.
दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी संवाद साधल्याचे सांगितले. ऑक्टोबरअखेरीस मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक आणि वृत्तपत्रांतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाला वस्तुस्थिती विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा दिल्या जात असल्याच्या आणि सिबिल गुणांकनामुळे कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारींकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज, नोटिसा आणि आवश्यक कागदपत्रांसह तपशील उपलब्ध करून द्यावेत. त्याआधारे बँक अधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळासह पाठपुरावा करू आणि आवश्यकता भासल्यास केंद्रीय अर्थमंत्र्यांनाही पत्र लिहू, असे त्यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रबाबत पत्रकारांनी मांडलेल्या तक्रारींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून बँका अशा पद्धतीने वागत असतील, तर लाडक्या बहिणींनी आपली खाती दुसऱ्या बँकेत हलवण्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
खासगी कर्ज आणि मायक्रो फायनान्सच्या वसुलीचा प्रश्नही गंभीर असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. दुष्काळ किंवा आपत्तीग्रस्त भागात मायक्रो फायनान्सच्या कर्जहप्त्यांची सहा महिने ते एक वर्षासाठी फेररचना करण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट नियम करावेत, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणीवाटपाच्या प्रश्नावर स्थानिक गरजा, उपलब्ध पाणीसाठा आणि नियमानुसार समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या गरजांना न्याय मिळण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी व्यवसायाधारित महिला समूह, बचत गट आणि एकल महिलांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असेही त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यांच्या अंमलबजावणीबरोबर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तुळजापूर, पंढरपूर आणि अन्य प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनासाठी अधिक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असावेत, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. भाविकांसाठी विश्रांतीची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रसादाची गुणवत्ता आणि गर्दीचे सुरक्षित नियोजन यांकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्या

