राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि INDIA आघाडीच्या खासदारांवरील पोलीस कारवाईचा पुणे शहर काँग्रेसकडून निषेध
पुणे : दिल्लीतील आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी व INDIA आघाडीच्या खासदारांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
मुख्य निवडणूक आयुक्तांकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि INDIA आघाडीचे खासदार शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने जंतर-मंतरकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. या कारवाईदरम्यान काही खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले तसेच काही जण जखमी झाल्याचा दावाही पक्षाने केला.
या कारवाईचा निषेध करत काँग्रेसने 8 ऑक्टोबरचा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, नगरसेवक रफिक शेख, खजिनदार चंद्रशेखर कपोते, भाऊसाहेब आजबे, उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्यासह प्रथमेश अबनावे, संजय मोरे, विजय साबळे, शिवानी मोरे, राहुल वंजारी, गुलामहुसेन खान, राजेंद्र भुतडा, कैलास गायकवाड, दीपक ओव्हाळ, ॲड. योगेश माकणे, किशोर मारणे, धीरज खोरे, समद शेख, प्रियांका मधाळे, ऋषिकेश जाधव, सुभाष जेधे, विशाल जाधव, चैतन्य पुरंदरे, युवराज मदगे, सुरेश नांगरे, सेल्वराज ॲन्थोनी, प्राजक्ता जाधव तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

