महाराष्ट्रातील SIR रद्द करण्याची मागणी; निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चात राज यांचा एल्गार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या संयुक्त महामोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत व्होटिंग मशीन बंद करून देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची जोरदार मागणी केली. “होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी,” असे खुले आव्हान देत त्यांनी महाराष्ट्रात करण्यात आलेला SIR तातडीने रद्द करण्याची मागणीही केली.
निवडणूक आयोगाविरोधातील या मोर्चाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी जमू लागल्यानंतर साधारण अकराच्या सुमारास ‘मेट्रो सिनेमा ते महापालिका’ असा संयुक्त मोर्चा मार्गस्थ झाला. या मोर्चात निवडणूक आयोगाविरोधात तसेच भाजपविरोधात दोन्ही नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. “महाराष्ट्रात जो SIR झाला, तो रद्द झाला पाहिजे. संपूर्ण देशात एकाच वेळी SIR करणे बेकायदेशीर आहे. मोठी नैसर्गिक आपत्ती आली, मोठ्या तक्रारी आल्या तरच SIR करता येतो, अशी कायद्यात तरतूद आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते बेकायदेशीर आहे,” असा दावा त्यांनी केला. “आता दोन कोटी मतदार बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. हे आमचे मतदार आहेत की कोण आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी राज ठाकरे यांनी देशातील सर्व निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. “जो लोकांसमोर जाईल, जो चांगले काम करेल, त्याला लोक मतदान करतील. पण आता लोकांना अंधारात ठेवण्याचे काम सुरू आहे. व्होटिंग मशीन बंद करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,” असे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास राहावा, यासाठी ही पद्धत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, कोणताही पक्ष सत्तेवर असताना त्याला जनतेची भीती असली पाहिजे. चुकीची पावले उचलली तर जनता घरी बसवेल, ही जाणीव असली पाहिजे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ती भीती उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. “दिसली जमीन की विकली जात आहे, सगळेच संस्थात्मक ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी 44 लाख 27 हजार मते मिळाली. सहा महिन्यांनी तीच मते 3 कोटींच्या पुढे कशी गेली? 40 ते 60 लाख मतदार अचानक कसे वाढले?” असा सवाल त्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेबाबत सत्ताधाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“2017-18 पासून मी सांगत आहे की व्होट चोरी सुरू आहे. निवडणुकांवर बहिष्कार टाका, असेही मी तेव्हा म्हटले होते. त्याशिवाय दूध का दूध, पाणी का पाणी होणार नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले. देशात व्होटचोरीमुळे वातावरण तापले असून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरच गदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही सहभाग घेतला. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “ज्ञानेश कुमार हे या भ्रष्ट कारभाराचे एक प्रतीक आहेत. 2014 पासूनचा हा काळ काळा काळ म्हणून ओळखला जाईल. आता लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपली आहे,” असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी हा मोर्चा म्हणजे जनतेचा आवाज असल्याचे सांगितले. “हा लोकशाही वाचवण्याची गर्जना आहे. हा आवाज आता संपूर्ण देशभर घुमेल. प्रत्येक पक्षाचे उद्दिष्ट एकच आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
निवडणूक आयोग, मतदान प्रक्रिया, SIR आणि मतदार याद्यांतील कथित अनियमितता या मुद्द्यांवरून विरोधक अधिक आक्रमक होत असल्याचे या मोर्चातून स्पष्ट झाले. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने या आंदोलनाला वेगळीच राजकीय धार मिळाली असून आगामी काळात या मुद्द्यावर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

