अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाही, विकासकामे आणि निधीच्या वापराची माहिती तपासणार
पुणे : पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाही, विकासकामांची प्रगती आणि निधीचा वापर याबाबतची माहिती तपासण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पुणे शहर शाखेने ‘Ward Office Accountability’ अभियान सुरू केले आहे. पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून, उपलब्ध अधिकृत नोंदींच्या आधारे वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडणार असल्याचे सांगण्यात आले. अभियान सुरू केल्याची माहिती शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे यांनी येथे दिली .या अभियानाबाबत शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली असून, शंकर थोरात, निरंजन अडागळे, सुनील सवदी, सुनीता काळे, माधुरी गायकवाड आणि किशोर मुजुमदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. बेनकर आणि जगदाळे यांनी अभियानाचा अहवाल नागरिकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, पुणेकर मालमत्ता कर, पाणीपट्टीसह विविध कर आणि शुल्क भरत असताना रस्ते, पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज, पथदिवे आणि इतर नागरी समस्यांसाठी अनेकदा क्षेत्रीय कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी असावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
अभियानादरम्यान क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी अधिकृत कामकाजाच्या वेळेत उपलब्ध आहेत का, नागरिकांच्या तक्रारींची व्यवस्थित नोंद होते का, त्यावर कोणत्या अधिकाऱ्याकडून आणि किती कालावधीत कार्यवाही केली जाते, तसेच किती तक्रारी प्रलंबित आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. कर्मचारी उपस्थिती आणि नागरी प्रकल्पांमधील विलंब हे अभियानातील प्रमुख मुद्दे असल्याचेही सांगितले आहे.
विविध विकासकामांचे मंजुरी आदेश, कार्यादेश, अंदाजपत्रके, खर्च आणि कामांची प्रगती याबाबतच्या उपलब्ध नोंदींचीही पाहणी केली जाणार आहे. कंत्राटदारांना देण्यात आलेली कामे आणि त्यासंबंधी प्रक्रिया, नागरिक सनदीनुसार सेवांसाठी निश्चित केलेली कालमर्यादा, तसेच कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित असलेली सार्वजनिक माहिती याचाही आढावा घेण्यात येईल.
माहितीचा अधिकार कायदा आणि अन्य लागू तरतुदींनुसार नागरिकांना मिळू शकणाऱ्या अधिकृत नोंदी व कागदपत्रांच्या आधारे ही पाहणी करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन कर्मचारी उपलब्धता, नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाही आणि माहिती देण्याची प्रक्रिया यांची तपासणी केली जाणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महापालिका प्रशासनातील कामकाज अधिक उत्तरदायी असावे आणि नागरिकांना मूलभूत सेवांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे. अभियानादरम्यान प्रत्यक्ष परिस्थितीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे अहवाल पुणेकरांसमोर मांडण्यात येणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
पक्षाने “काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान आणि कामचुकारपणाला जबाबदारी” अशी भूमिका मांडली आहे. या अभियानातून कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला वैयक्तिकरीत्या लक्ष्य करण्याऐवजी प्रशासकीय प्रक्रियेतील जबाबदारी निश्चित करणे आणि नागरिकांना त्यांच्या तक्रारींच्या कार्यवाहीची माहिती मिळवून देणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

