पुणे-महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या घटक पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भाजपकडून या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसांत निश्चित केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातील असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अंतिम निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य असेल, असे पाटील यांनी सांगितले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. विद्यमान आमदार अरुण लाड यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील घटक पक्षांनी या जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याकडे महायुतीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठीही महायुतीतील घटक पक्षांकडून तयारी सुरू आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि प्रा. डॉ. सचिन सानप यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची उमेदवारीही महायुतीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपकडून दोन्ही जागांवर दावा केला जात असला, तरी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटप करताना घटक पक्षांमध्ये कोणता फॉर्म्युला ठरतो, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. विभागीय प्रशासनाने अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे 3 लाख 11 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी सुमारे 52 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, 2026च्या विधान परिषद निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

