पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर आता शहरातील रस्त्यांवर उभारलेले मांडव, कमानी, स्वागत कक्ष, फ्लेक्स तसेच मिरवणुकीत वापरण्यात आलेले रथ, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि गाडे पुढील ४८ तासांत हटवून सर्व रस्ते सुरळीत वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
पत्रात त्यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. पोलीस दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या अविश्रांत मेहनतीमुळे मिरवणूक सुरळीत पार पडल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र उत्सवानंतर रस्त्यांवरील तात्पुरत्या संरचना अनेक दिवस तशाच राहतात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्ते अडविणारे मांडव, मिरवणुकीतील रथ, ट्रॅक्टर-ट्रॉली, गाडे, कमानी आणि स्वागत कक्ष तातडीने हटवण्याची आवश्यकता आहे.
तसेच अनेक ठिकाणी फ्लेक्स धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले असून काही ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलही झाकले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शहरातील वाहतूक पूर्ववत आणि सुरळीत करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कारवाई करून पुढील ४८ तासांत रस्ते पूर्णपणे खुले करावेत, अशी अपेक्षा खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.

