६३ मोबाईल, शेवरलेट क्रूझ कारसह ३०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या खिशातील मोबाईल फोन चोरणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय असलेल्या टोळीवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी ११ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे ६३ मोबाईल फोन, एक शेवरलेट क्रूझ कार, दोन सुऱ्या, कटर आणि लाल मिरची पावडर असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते सकाळी ६.३० या वेळेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, झाशीची राणी चौक, पुणे महापालिका परिसर आणि लक्ष्मी रोड येथे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर शिवाजीनगर पोलिसांचे पथक लक्ष ठेवून होते.
निगराणी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खुडे ब्रिजजवळ नदीपात्रालगत काही जण हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले आहेत. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे यांच्या पथकाने कारवाईची तयारी केली.
पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करून ११ जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत:
- अब्दुल कादिर नूर मोहम्मद (वय २८), रा. गुलशेरनगर/गुलशननगर, गल्ली क्रमांक ७, मालेगाव, नाशिक.
- अब्दुल मलिक अब्दुल खालिक (वय २२), रा. गुलशेरनगर/गुलशननगर, गल्ली क्रमांक १४, मालेगाव, नाशिक.
- जियाउर रहमान शौकत हुसेन (वय २६), रा. प्लॉट क्रमांक १२, सर्वे नं. १०३/१, हिरापुरा, जैतून अब्दुल कादिर मशिदीजवळ, मालेगाव, नाशिक.
- मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१), रा. सालेम मुन्शी नगर, गल्ली क्रमांक २, सर्वे नं. २१४, घर क्रमांक ८९, मालेगाव, नाशिक.
- फैसल अजीज खान (वय २४), रा. प्लॉट क्रमांक ३३/४२, सर्वे नं. १२०/२ अ, हिरापुरा, मालेगाव, जि. नाशिक.
- हुजेफा अंजुम मोहम्मद साजिद (वय ३०), रा. घर क्रमांक २३४/२८८/२, रसुलपुरा, रविवार वॉर्ड, मालेगाव, जि. नाशिक.
- जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), रा. गल्ली क्रमांक ९, गुलशेरनगर, मालेगाव, जि. नाशिक.
- अझहर अहमद अल्लाफ अहमद मोमीन (वय ३०), रा. गुलशेरनगर, गल्ली क्रमांक २, मालेगाव, जि. नाशिक.
- नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (वय ३३), रा. गिरणा रोड, हिरापुरा, प्लॉट क्रमांक ६०, मालेगाव, जि. नाशिक.
- अतहर अहमद एजाज अहमद (वय २३), रा. गल्ली क्रमांक ५, सर्वे नं. १५९, प्लॉट क्रमांक १६, मुस्लिम नगर बी, मालेगाव, जि. नाशिक.
- अतुल मारोती इंगळे (वय २४), रा. मु.पो. गिरोली, मनोरा, जि. वाशिम.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ६३ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, शेवरलेट कंपनीची क्रूझ कार, दोन सुऱ्या, कटर आणि लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत ३० लाख ५७ हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(२), ३०९(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे, सहायक पोलीस फौजदार प्रदीप खळदकर, तसेच पोलीस अंमलदार गणेश चोबे, तेजस चोपडे, बिडे, वालकोळी, गणेश जाधवर, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, चोपडे आणि येसनपुरे यांनी सहभाग घेतला.

