निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे

Date:

मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या तपास वृत्तानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 10 महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या विविध निर्णयांवर 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकाराला थेट ‘मॅच फिक्सिंग’ म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील विस्तृत पोस्टमधून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांच्या मागे निर्णय घ्यायला लावणारे कोण होते, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आता पुस्तकापुरती उरल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांचे नेते राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना भेटत असताना त्यांच्याकडे प्रत्यक्षात अधिकार नसल्याचे जाणवत होते. मनसेने याबाबत यापूर्वीही वारंवार प्रश्न उपस्थित केले होते आणि आता समोर आलेल्या वृत्तातून त्या शंकांना आधार मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

द इंडियन एक्स्प्रेसच्या तपास वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे, Form-6 मधील बदल आणि मतदार डेटाबेसच्या व्यवस्थापनाशी संबंधित निर्णयांवर वेगवेगळ्या वेळी आक्षेप नोंदवले होते. Form-6 मध्ये SIRशी संबंधित प्रश्न जोडण्याच्या प्रक्रियेवरही दोन्ही आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.

राज ठाकरे यांनी या आक्षेपांचा उल्लेख करत, आयोगातील तीन सदस्यांपैकी दोन आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केले असताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी निर्णय कशाच्या आधारावर पुढे नेले, असा सवाल केला. त्यांच्या मते, मतदार याद्या आणि संबंधित सॉफ्टवेअरवरील स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करण्यात आले आणि निर्णयप्रक्रिया केंद्रीकृत करण्यात आली.

गोव्यात काही मतदारांना स्थानिक अधिकाऱ्यांनी पात्र ठरवल्यानंतरही त्यांची नावे वेळेत मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नसल्याचा मुद्दाही राज ठाकरे यांनी मांडला. पश्चिम बंगालमध्ये मतदारांच्या नावांबाबत दाखल करण्यात आलेल्या अपीलचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपद स्वीकारल्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी मतदार याद्यांच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. मनसेसह इतर विरोधी पक्ष जे आरोप करत होते, त्यालाच या नव्या वृत्तामुळे बळ मिळाल्याचा त्यांचा दावा आहे.

‘ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाहीच आणि त्यांच्या मागच्या बोलवत्या धन्याचीही चौकशी व्हायला हवी.” निवडणूक आयुक्त संधू आणि जोशी यांनी आक्षेप नोंदवल्याबद्दल त्यांनी दोघांचे अभिनंदन केले. तसेच या विषयावर तपास वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसचेही त्यांनी कौतुक केले.

याचवेळी राज ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, विरोधकांची पहिली लढाई निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात असली पाहिजे.

आता EVM विरोधात आंदोलनाची हाक

राज ठाकरे यांनी पुढील टप्प्यात EVMचा मुद्दाही उपस्थित केला. निवडणुका EVMऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त जनआंदोलन उभारावे, असे त्यांनी म्हटले. स्वायत्त नसलेला निवडणूक आयोग आणि EVM ही सत्ताधाऱ्यांची दोन महत्त्वाची अस्त्रे असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या कथित गैरकारभाराचा फायदा घेऊन सत्तेत आलेल्या सरकारनेही राजीनामा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने स्वायत्त झाला तरच सत्ताधाऱ्यांना लोकशाही मार्गाने आव्हान देता येईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी भाजपसमर्थक पत्रकारांवरही निशाणा साधला. “तुमच्या सभांना गर्दी होते, मग मतं कुठे जातात?” असा प्रश्न विचारणाऱ्यांना आज उत्तर मिळाले असेल, असा टोला त्यांनी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरोपींची पोलिस वाहनाच्या बोनेटवरून काढली धिंड: 18 पोलिसांवर गुन्हा

सीआयडीच्या उपअधीक्षकांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन गुन्हे; वरिष्ठ...

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महुआ मोइत्रांची दिल्ली पोलिसांत तक्रार; FIR नोंदवण्याची मागणी

मतदार याद्यांतील बदलांबाबत गंभीर आरोप; विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांना...

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; प्रा. दुल्ला यांना तत्काळ अटक करण्याची युवक काँग्रेसची मागणी

राहुल गांधींचा साहिलच्या पालकांशी संवाद; निष्पक्ष चौकशीची मागणी करत...