आरोपींची पोलिस वाहनाच्या बोनेटवरून काढली धिंड: 18 पोलिसांवर गुन्हा

Date:

सीआयडीच्या उपअधीक्षकांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन गुन्हे; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आरोपींच्या यादीत नाहीत

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलांना पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसवून सार्वजनिक रस्त्यावरून नेल्याच्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पोलिस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पहाटे 4.25 वाजता आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले.

तक्रारीनुसार, 20 जुलै रोजी खुनाच्या एका गुन्ह्यात काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 21 जुलै रोजी काही मुलांना पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसवून, दोरखंडाने बांधून सार्वजनिक रस्त्यावरून नेण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संबंधित अल्पवयीन मुलांची ओळख सार्वजनिक झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यावेळी काही मुलांना जमावाकडून मारहाण झाल्याचा, तसेच पोलिसांच्या ताब्यात असताना काहींना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. काही अल्पवयीन मुलांना निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हे सर्व आरोप तपासाचा भाग असून त्यांची सत्यता पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली होती. आयोगाच्या तथ्यशोधन अहवालातील निरीक्षणे आणि त्यानंतरच्या आदेशांच्या आधारे सीआयडीमार्फत तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहिता, बाल न्याय कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हे नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त यांची नावे या FIRमधील आरोपींच्या यादीत नाहीत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने स्थगिती नेमक्या कोणत्या कार्यवाहीला लागू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मूळ खुनाच्या गुन्ह्याचा तपास आणि त्यानंतर अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून कथितरीत्या देण्यात आलेल्या वागणुकीबाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा ही दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत द इंडियन एक्स्प्रेसने...

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महुआ मोइत्रांची दिल्ली पोलिसांत तक्रार; FIR नोंदवण्याची मागणी

मतदार याद्यांतील बदलांबाबत गंभीर आरोप; विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांना...

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; प्रा. दुल्ला यांना तत्काळ अटक करण्याची युवक काँग्रेसची मागणी

राहुल गांधींचा साहिलच्या पालकांशी संवाद; निष्पक्ष चौकशीची मागणी करत...